पुढील वर्षी सुरू होणार चित्रिकरण
अभिनेत्री सोनम कपूर लवकरच प्रेक्षकांना आणखी चांगल्या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. रांझणा, नीरजा, प्रेम रतन धन पायो आणि अन्य चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करणारी सोनम सध्या एका चांगल्या पटकथेवर काम करत आहे. 2024 मध्ये ‘बॅटल फॉर बिटोरा’ या चित्रपटाचे काम सुरू करणार असल्याचे तिने सांगितले आहे.
हा चित्रपट अनुजा चौहान यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित असणार आहे. 2010 मध्ये प्रकाशित ही कादंबरी एका अॅनिमेशन तज्ञाची कहाणी मांडणारी आहे. हा तज्ञ बिटोरामध्ये पूर्वाश्रमीच्या राजघराण्याच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा तयार झाली असून आम्ही एका अभिनेत्याचा शोध घेत आहोत तसेच दिग्दर्शकही अद्याप ठरला नाही. केवळ निर्माता आणि मुख्य अभिनेत्रीची निवड झाली आहे. हा चित्रपट अनिल कपूर फिल्म्स कंपनीच्या बॅनर अंतर्गत निर्माण केला जाणार असल्याचे सोनमने सांगितले आहे. कथितपणे सोनमची बहिण रिया कपूरने 2010 मध्ये या कादंबरीचे हक्क विकत घेतले होते.
या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला समाविष्ट करण्याचा विचार सुरू होता. परंतु भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध पाहता हे शक्य नसल्याचे मानले जात आहे. याचमुळे आता नव्या अभिनेत्याचा शोध घेण्यात येत असल्याचे सोनमकडून सांगण्यात आले.









