आपल्या बहिणीला जेवणातून विष देऊन मारले : सोनालीची बहीण, बंधू व नातेवाईकांचा दावा निजी सचिवासह दोघांना अटक करण्याची मागणी
गिरीश मांद्रेकर /म्हापसा
हरियाणाच्या भाजपा नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यूचे गूढ वाढत गेले असून त्यांची हत्या करण्यात आली की त्यांचे नैसर्गिक निधन झाले, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच त्यांचे बंधू रिंकू ढाका यांनी आपल्या बहिणीचा पूर्वनियोजित खून झाला असल्याची लेखी तक्रार हणजूण पोलीस स्थानकात केली आहे. आपल्या बहिणीला राजकारणातून बाजूला करण्यासाठीच हा पूर्व नियोजित कट असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. सोनालीचे निजी सचिव सुधीर सांगवान व त्याचा मित्र सुखविंदर सिंग यांची संशयित म्हणून नावे पोलिसांना देण्यात आली असून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी लेखी मागणीही पोलिसांकडे केली आहे. हणजूण पोलीस जोपर्यंत ही तक्रार नोंद करून गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत शवचिकित्सा करू देणार नाही, असेही त्यांनी म्हटल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. मंगळवारी रात्रीच सोनाली यांचा भाऊ रिंकू ढाका व अन्य नातेवाईक गोव्य़ात पोहोचले आहेत.
पोलीस निरीक्षक प्रशिल देसाई यांची भेट घेतली असता ते म्हणाले की सोनाली मृत्यूप्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंद करून घेतला आहे. जोपर्यंत शवचिकित्सा होत नाही तोपर्यंत मृत्यूमागील निष्कर्ष काढणे शक्य नाही.
ंिरंकू ढाका म्हणाले की आमच्या हरियाणामध्ये प्रथम एफआयआर नोंद केला जातो व नंतर शवचिकित्सा करण्यात येते. मात्र गोव्यात तशी पद्धत नसल्याची माहिती आपणास पोलिसांनी दिली. शवचिकित्सा अहवालात काही संशयास्पद आढळून आल्यास संशयितांना त्वरित ताब्यात घेऊन अटक करू असे पोलिसांनी आपणास आहे, मात्र पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सोनाली गोव्यात कशी पोहोचली?
सोनालीने घरातून बाहेर पडताना चंदीगड येथे पक्षाच्या कामासाठी जात असल्याचे सांगितले होते. मात्र ती गोव्यात कशी पोहोचली? याची चौकशी व्हायला पाहिजे, असे ढाका म्हणाले.
सुधीर, सुखविंदर यांना अटक करा
सोनालीचे निजी सचिव सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग सांगवान हे दोघेही आपल्या बहिणीसमवेत आले होते. या दोघांनी षडयंत्र रचून बहिणीच्या जेवणात विष घालून तिचा खून केला आहे, असा थेट आरोप ंिरंकू ढाका यांनी केला आहे. या दोघांवरही गुन्हा नोंद करुन त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
अन्यथा शवचिकित्सा दिल्ली किंवा जयपूरला करणार
वरील दोन्ही संशयितांवर जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही सोनालीची शवचिकित्सा करू देणार नाही. डॉक्टरांनी शवचिकित्सा केली आणि आम्हाला त्यात काही संशयास्पद आढळून आल्यास आम्ही दिल्ली वा जयपूर येथील एम्स इस्पितळात पुन्हा शवचिकित्सा करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संशयितांची नावेही पोलिसांना देण्यात आली आहेत. मात्र पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप ढाका यांनी केला आहे.
पोलीस महासंचालकांकडूनही मिळत नाही सहकार्य
आपणास स्थानिक हणजूण पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्याशी आपण त्याबाबत चर्चा केली आहे. मात्र त्यांच्याकडूनही सहकार्य मिळत नाही. गोव्यातील पोलीस सुस्त आहे असा आरोप रिंकू ढाका यांनी केला.
विषप्रयोग होत असल्याची सोनालीला आली होती कल्पना?
सोनालीच्या बहिणीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सोमवारी सकाळी आपण व आपल्या आईने सोनालीजवळ फोनवरून बातचित केली असता त्या म्हणाल्या होत्या की, आपण ठीक आहे. मात्र जेवल्यावर आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळे आपल्यास वाटते की अन्नातून कोणतरी आपल्यावर विषप्रयोग करीत आहे. सायंकाळी जेव्हा पुन्हा फोन केला तेव्हाही तेच सांगण्यात आले. पुन्हा रात्री 11 वाजताही आम्ही सोनालीशी बोललो, मात्र दुसऱया दिवशी सकाळी आम्हाला तिच्या निधनाची बातमी आली ती धक्कादायक होती. सोनालीने 27 ऑगस्टला आपण पुन्हा घरी येणार असल्याचे सांगितले होते, अशी माहितीही त्यांच्या बहिणीने दिली.
जेवणानंतर सोनालीचे पाय थरथरत होते
रिंकू ढाका यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून जेवण केल्यानंतर तिचे हाथ पाय थरथरत होते, तिला भीतीही वाटत होती. तसे तिने घरच्याना सांगितले होते. आम्ही तिला सोबत असलेल्या सहकाऱयांपासून सांभाळून राहण्याचा सल्लाही दिला होता मात्र त्यानंतर तिच्या मृत्यूची बातमी आम्हाला सकाळी कळली असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
प्रकरणाचा एकंदर घटनाक्रम
सोनाली फोगट यांचा मंगळवारी सकाळी हणजूण येथील द ग्रँड लिओनीमध्ये संशयितरित्या मृत्यू झाला. तिच्या सहकाऱयांनी तिला त्वरित स्थानिक खासगी इस्पितळ सेंट अँथोनी हॉस्पिटल रिसर्च सेंटर हणजूण येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. नंतर म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळ व त्यानंतर गोमेकॉत शवचिकित्सासाठी मृतदेह पाठविण्यात आला. प्राथमिक चौकशीत तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले असले तरी या मृत्यूबाबत संशय व्यक्त झाला होता. मात्र सोनालीचे बंधू व नातेवाई गोव्यात आल्यावर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून आपली बहीण सोनालीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने नसून तिचा राजकारणातून काटा काढण्यासाठीच हा पूर्वनियोजित पद्धतीने केलेला खून असल्याचा आरोप ढाका यांनी केला आहे.
कर्लीजमध्ये घेतले होते भोजन
सोनाली फोगट या आपले खासगी सचिव सुधीर सांगवान, सुधीरचे मित्र सुखविंदर सिंग सांगवान, आपली मुलगी व अन्य इसमाबरोबर उतरल्याचे आढळून आले आहे. घटना घडली त्या पूर्व रात्रीला 22 रोजी सोनाली हणजूण येथील कर्लीज हॉटेलमध्ये भोजनासाठी गेली होती. तेथे जेवण केल्यानंतर त्या एका डान्स क्लबमध्येही गेल्याचे आढळून आले आहे. कर्लीजमध्ये किती वेळ घालविला हे स्पष्ट झाले नसले तरी आपल्या हॉटेलात हजारो लोक जेवणासाठी येतात. सोनाली कधी आली कधी गेली हे कळले नाही असे कर्लिजचे मालक एडवीन यांनी पोलिसांना स्पष्ट केले आहे.
सोनाली ज्या क्लबमध्ये गेल्या होत्या तेथे त्यांनी मद्य सेवन केले होते काय वा त्यांनी अमलीपदार्थ सेवन केला होता काय, हे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट होणार आहे. शवचिकित्सा करण्यासाठी डॉक्टरांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी व इतर सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत तज्ञ डॉक्टर व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आज गुरुवारी शवचिकित्सा होणार आहे.