सुपरस्टार मोहनलाल यांच्या चित्रपटात संधी
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला आता मोठी संधी मिळाली आहे. सोनालीने स्वतःच्या अभिनयक्षमतेने चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सोनाली आता एका मल्याळी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्या या चित्रपटाचा पहिला लुक समोर आला आहे.

सोनालीने या मल्याळी चित्रपटासंबंधी जानेवारी महिन्यात चाहत्यांना माहिती दिली होती. त्यानंतर तिने आता तिच्या पहिल्या मल्याळी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. सोनालीने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये डोंगर-दऱया, नदी दिसून येत आहे. तसेच पावलांचे तीन ठसेही यात दिसून येत आहेत. या पोस्टरने सोनालीच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोनालीच्या या मल्याळी चित्रपटाचे नाव ‘मलाइकोकटाई वालीबन’ असे आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर काम करणार आहे. या चित्रपटाच्या कहाणीचे स्वरुप अद्याप समोर आलेले नाही. सोनाली या चित्रपटाद्वारे आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करू पाहत आहे. सोनाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.









