सोनालीची आत्महत्या नसून घातपातच ; संशयिताला गजाआड करा ; नातेवाईकांची मागणी
प्रतिनिधी
बांदा
इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (२५) या युवतीच्या नाट्यमय मृत्यू प्रकरणाला दीड महिना उलटला तरीही पोलीस संशयितापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर सोनालीचे मामा व इन्सुली ग्रामस्थांनी शनिवारी बांदा पोलीस स्टेशनवर धडक दिली. सोनालीची आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू नसून घातपातच असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाचा कसून तपास करावा व संशयिताला गजाआड करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. सोनाली मृत्युप्रकरणी सर्व बाजूने तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी सांगितले.सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या समवेत झालेल्या बैठकीत स्थानिकांनी अनेक शंका उपस्थित केल्या. घसरून पाण्यात पडली असेल तर तिच्या अंगावर जखम का नाहीत ?, फूटभर पाण्यात पडून युवतीचा मृत्यू होऊ शकतो का ? पाऊस नसताना झुडपातून तिचा मृतदेह पुढे ६० मिटरपर्यंत कसा गेला ?असे अनेक प्रश्न उपस्थित केले. सोनालीचा घातपातच झाला असून संशयिताचा तत्काळ शोध घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून पाहण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही या प्रकरणाचा कसून तपास केला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. शिवाय तीच्या अंगावर जखमही नव्हती. नातेवाईकांचा कोणावर संशय असल्यास पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी केले. संशयीताला नक्कीच गजाआड केले जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला.यावेळी मयत सोनालीचे मामा रुपेश परब, भाऊ आदेश गावडे, अनंत वारंग, उदय कोठावळे, आनंद गावडे, अनील रेडकर, शांताराम बांदिवडेकर, विठ्ठल परब, प्रेमकांत वारंग, उत्तम शिंदे, भिवसेन रेडकर, अजित कोठावळे आदी उपस्थित होते.









