खेड / राजू चव्हाण :
मणिपूर इंफाळ येथे सुरू असलेल्या १३४ व्या आशिया फुटबॉल स्पर्धेत तालुक्यातील मोरवंडे-बौद्धवाडीचा रहिवाशी आणि बोरज येथील नॅशनल अॅकॅडमी कॅम्पचा विद्यार्थी प्रेम प्रमोद मर्चेंडे याने आशियातील सर्वात मानाचा समजला जाणारा डुरंड चषक पटकावत तालुक्याचे नाव जागतिक पातळीवर कोरले. भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटचा तो जवान आहे. डुरंड चषकाचा झेंडा फडकवण्याचा मान मिळाल्याने त्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
जागतिक स्तरावरील स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी भारतीय सैन्यदलात निवड होऊन आशियातील सर्वात जुन्या प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धेत झेंडा फडकवण्याचा मान मिळवतो हे कोकणवासियांसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. डुरंड चषक स्पर्धा ही आशिया खंडातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा मानली जाते. १८८८ मध्ये डुरंड चषक सुरू झाल्यानंतर भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव सर मॉर्टिमल यांनी चषकावर नाव कोरले होते.
भारतीय सैन्यदलात सेवा बजावणाऱ्या मर्चेंडे याने आशियाई फुटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत भारताला सन्मान मिळवून दिला. दोन महिन्यापूर्वीच त्याला उत्कृष्ट सैन्यदलातील जवान हा पुरस्कारही प्राप्त झाला होता. आशिया फुटबॉल स्पर्धेतही चषक पटकावत देशाची शान उंचावत जागतिक पटलावर नाव कोरण्याची किमया करणाऱ्या मर्चडेवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गेल्या ४ वर्षापासून अपार मेहनत घेत त्याने भारतीय सैन्यदलात सामील होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवले आहे. तालुक्यातील मोरवंडे येथील तालुका बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्र.९ चे सरचिटणीस प्रमोद मर्चेंडे यांचा तो चिरंजीव आहे. भारतीय सैन्य दलात निवड झाल्यानंतरही त्याने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याची किमया केली होती. ४ डिसेंबर २०२४ मध्ये तो भारतीय सैन्यदलातील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो देशसेवेत रूजू झाला.
सद्यस्थितीत तो२ महार रेजिमेंटमध्ये मणिपूर येथे देशाची सेवा बजावत आहे. बोरज येथील नॅशनल अॅकॅडमी कॅम्पचे प्रशिक्षक किशोर आदावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्यदलाचे धडे गिरवत आत्मविश्वासाच्या बळावर त्याने यशाला गवसणी घातली आहे. यापुढील स्पर्धांमध्येही दैदिप्यमान कामगिरी करण्याचा मानस आहे.








