एक वर्षापूर्वी बनवली होती लाकडी पालखी
विजय पाटील सरवडे
उतारवयात अनेक मुले आपल्या आई- वडीलांकडे दुर्लक्ष करतात. कांही जण तर आई- वडीलांचा सांभाळ न करता त्यांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवतात. परंतु अशा विचित्र परिस्थितीतही कांही जण आपल्या आई- वडीलांवर नितांत प्रेम देखील करतात हे उंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती शिवाजी पाटील यांनी दाखवून दिले आहे. श्रीमती भगिरथी शिवाजी पाटील (वय ८७) या आपल्या आईच्या निधनानंतर त्यांनी भजनाच्या गजरात चक्क पालखीतून अंतयात्रा काढून मातृप्रेमाची वेगळी प्रचिती दिली. विशेष म्हणजे आई वृद्धापकाळाने आजारी पडल्यानंतर एक वर्षापूर्वीच त्यांनी लाकडाची पालखी बनवून घेतली होती.
उंदरवाडी ता कागल येथील मारुती शिवाजी पाटील यांचा सामाजिक उपक्रमात कायम सहभाग असतो. यापूर्वी त्यांनी गावात वेगवेगळे लक्षवेधी उपक्रम राबविले आहेत. इतरांना मदत करत असताना आपल्या आईबद्दल देखील त्यांनी नेहमीच आदराची भावना ठेवली. आपल्या आईने गरीबीमध्ये कष्ट करून आपले पालनपोषण केले याची जाणीव ठेवून त्यांनी वृध्दापकाळात आपल्या आईची फार काळजी घेतली. कांही दिवसापुर्वी सर्व नातेवाईकांना बोलावून आईच्या पाद्य पूजनाचा कार्यक्रम देखील घेतला.
आईच्या हयातीत जशी काळजी घेतली तशी आईच्या निधनानंतरही अंत्यसंस्कार देखील चांगल्या पद्धतीने पार पाडायचे ठरविले. आई फार आजारी पडल्यानंतर त्यांनी लाकडी पालखी बनवून घेतली व निधनानंतर अंतयात्रा पालखीतून काढली. देश परदेशात नोकरी करणारी अनेक मुले आपल्या आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित देखील राहत नाहीत तर अनेक जण वृध्दापकाळात वाईट वागणूक देतातअशी परिस्थिती समाजात पहायला मिळत असताना मारुती पाटील यांनी आपल्या आईच्या कष्टाचे उपकार लक्षात ठेवून त्यांची चांगल्या पद्धतीने देखभाल केली. शिवाय आईच्या मृत्यूनंतर सजवलेल्या पालखीतून अंतयात्रा काढली. त्यांच्या या कृतीने समाजात एक आदर्श निर्माण झाला असून मातृ प्रेमाने समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सरपंच अनिता पाटील यांच्या त्या सासू होत. रक्षाविसर्जन आज शुक्रवारी आहे.









