प्रेमाला वयाची अट असत नाही, असे म्हणण्याची पद्धती आहे. त्यामुळे पतीपेक्षा पत्नी वयाने मोठी असणे, ही बाब सर्वपरिचित आहे. तथापि, पुत्र पतीपेक्षा वयाने मोठा असणे, ही बाब अद्भूत मानावी लागेल. पण अशी घटना जपानमध्ये घडली आहे. येथील एका महिलेने अशा पुरुषाशी विवाह केला आहे, की जो तिच्या पुत्रापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे. या महिलेचे वय 63 वर्षे असून तिच्या पतीचे वय 31 वर्षांचे आहे. अर्थातच, त्यांचा प्रेमविवाह आहे. या महिलेचा पूर्वी एक विवाह झाला होता. त्या विवाहातून तिला एका पुत्राची प्राप्ती झाली. त्या विवाहातून मुक्त होऊन तिने आपल्या वयाच्या निम्म्यापेक्षा कमी वयाच्या तरुणाशी सूत जुळवले. त्यामुळे अशा प्रकारच्या विचित्र संबंधांची निष्पत्ती झाली आहे.
या महिलेचे नाव आजरशी असे आहे. तिचे प्रेम कसे जुळले, ही कथाही अद्भूत वाटावी, अशीच आहे. 2020 मध्ये ही महिला एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तिथे तिला एक मोबाईल हँडसेट सापडला. एक तरुण तो विसरुन गेला होता. तो मोबाईल शोधत रेस्टॉरंटमध्ये आला, तेव्हा तिची आणि त्याचा परिचय झाला. या महिलेचा वयाच्या 48 व्या वर्षी घटस्फोट झाला होता. ती एकटीच्या जीवावर तिच्या पुत्राचे पालनपोषण करीत होती. नंतर कधी ट्राममध्ये तर कधी अन्य स्थानी त्यांची एकमेकांशी भेट होत राहिली. या परिचयाचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा विवाह झाला.
जपान हा आधुनिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत देश आहे. तथापि, अशा देशातही हा विवाह अनेकांना रुचलेला नाही. त्यामुळे सोशल मिडियावर जेव्हा या विवाहाची माहिती प्रसारित झाली, तेव्हा अनेकांनी त्यांच्या वयांमधील अंतरावर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तथापि, आजरशी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या नव्या पतीने हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. लोक काय म्हणतात, याची त्यांना पर्वा नाही. विवाहानंतर आतापर्यंत त्यांच्यात कोणतेही मतभेद निर्माण झालेले नाहीत. तसेच वयात इतके अंतर असूनही त्यांचे एकमेकांशी वैचारिक आणि भावनीक संबंध सुरळीत आहेत. या विवाहाची मोठी चर्चा समाजमाध्यमांवर होत असून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









