सिंधुत्व व इतर प्रमाणपत्रांच्या पूर्ततेअभावी विलंब : 453 जणांना नियुक्तीपत्रे तर 126 वंचित
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कागदपत्रांची पडताळणी झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्रे दिली जात आहे. आतापर्यंत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 453 शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून ते शाळांवर रुजू झाले आहेत. परंतु, अद्याप 126 शिक्षकांना सिंधुत्व तसेच इतर प्रमाणपत्रांच्या विलंबामुळे नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत.
राज्यात मागील वर्षी 15 हजार शिक्षकांची भरती जाहीर करण्यात आली. त्यापैकी 13 हजार उमेदवार पात्र ठरले. परंतु, शिक्षक भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे वर्षभर ही प्रक्रिया चालली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 579 पदांसाठी शिक्षक भरती करण्यात येणार होती. यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली.
मागील दोन महिन्यात आतापर्यंत 453 शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. अद्याप 126 शिक्षकांचे अर्ज शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहेत. यापैकी 118 शिक्षकांच्या नेमणुका केवळ सिंधुत्व प्रमाणपत्रासाठी अडविण्यात आल्या आहेत. तलाठी, तहसीलदार, सर्कल यांच्याकडून वेळकाढूपणा सुरू असल्याने सिंधुत्व प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शिक्षक अडचणीत सापडले असून लवकर सिंधुत्व प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जात आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या कागदपत्रांची पडताळणी धारवाड येथील किम्स हॉस्पिटलमध्ये केली जात आहे. बेळगावसह गुलबर्गा, बागलकोट, कारवार व धारवाड या जिल्ह्यांमधील दिव्यांगांच्या कागदपत्रांची पडताळणी एकाच ठिकाणी केली जात असल्याने विलंब होत आहे. त्यामुळे नियुक्त्या मिळण्यास शिक्षकांना वेळ होत असून किम्स हॉस्पिटलने दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी वेळेवर करून ती जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवून देण्याची मागणी शिक्षकांमधून केली जात आहे









