भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा टोला
प्रतिनिधी / पणजी
समाजातील दुर्बल घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविणारे अनेक निर्णय भाजप सरकारने हल्लीच्या काळात घेतले आहेत. त्यातून सरकारची वाढणारी लोकप्रियता विरोधकांना खूपत आहे. त्यातून जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते निरर्थक टीका करत आहेत, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला.
शनिवारी पणजीत पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी संकल्प आमोणकर, प्रेमेंद्र शेट यांचीही उपस्थिती होती. राज्यातील घरे नियमित करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे स्थानिक बहुजन समाजातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र भलेही हा निर्णय लोकहिताचा असला तरी त्यातून विरोधकांचे दुखणे वाढले आहे. लोकांच्या मनात सरकारप्रती आदरभाव वाढत असल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत, अशी टीका नाईक यांनी केली.
याच सरकारने राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना हंगामी दर्जा मिळवून दिला. त्यांच्या आतापर्यंतच्या सेवेची दखल घेताना सरकारने त्यांना अनेक सोयीसुविधा मिळवून दिल्या. समाधानकारक पगारवाढही मिळवून दिली. त्यातून या शेकडो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे गोमंतकीय जनता भाजपकडे ओढली जात असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच त्यांच्या टीकेची धार वाढली आहे, असे नाईक म्हणाले. राज्यातील विविध कोमुनिदाद जमिनीत बांधण्यात आलेली घरे 100 टक्के गोमंतकीयांची आहेत. हे लोक जास्त करून बहुजन समाजातील आहेत. त्यामुळे विधानसभा अधिवेशनात सरकारने ही घरे नियमित करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले. ‘माझे घर’ संकल्पनेचा विचार करून त्या घराचा मालकी हक्क बहुजन समाजाला मिळावा याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला. त्यानुसार अशा कुटुंबांची घरे नियमित केल्यास त्यांना कायदेशीर हक्क मिळतील. त्यायोगे पाणी, वीज, मालमत्ता कर यासारख्या सुविधा मिळविता येतील, हा त्यामागील हृद्य उद्देश असल्याचे दामू नाईक यांनी सांगितले.
राज्यात आजपासून ‘हर घर तिरंगा’ मोहीम
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज दि. 10 ऑगस्टपासून ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. नाईक यांनी दिली. या मोहिमेच्या माध्यमातून देशभक्तीला प्रोत्साहन देणे व देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या थोर स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाची महती आजच्या तऊणाईला समजावणे हा उद्देश असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आज दि. 10 पासून स्वातंत्र्यदिनी दि. 15 ऑगस्टपर्यंत आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, याच उत्सवाचा भाग म्हणून दि. 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. त्याशिवाय दि. 12 आणि 13 रोजी शहीद प्रतिमा स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. दि. 14 रोजी ‘विभाजन विभिषिका’ स्मृती दिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.









