शॅडो कौन्सिलने वेधले लक्ष, सावियो कुतिन्होंकडून मलनिस्सारण विभागावर निकृष्ट कामांबद्दल टीका
मडगाव : शॅडो कौन्सिल फॉर मडगावने मलनिस्सारण विभागावर रिंग रोडच्या बाजूने भू-गटार वाहिनी टाकताना आणखी एक निकृष्ट काम केल्याचा दावा करून त्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे रिंग रोडचा काही भाग खचण्याचे प्रकार घडले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. घटनास्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले की, अशा प्रकारे घोळ घालणे कधीही संपणार नाही असे दिसते. पूर्वीचे काम सदोष असल्याचे आढळून आल्याने त्याहून अधिक दराने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. आता नवीन कामातही दोषांची चिन्हे दिसू लागल्याने विभाग आणखी एक निविदा काढण्याचा निर्णय घेईल का, असा कुतिन्हो यांनी प्रश्न केला आहे. तोटा वसूल करून चुकार कंत्राटदारांना दंड ठोठावण्याच्या बाबतीत सरकार गप्प का बसते, असा सवालही त्यांनी केला आहे.
रस्त्यावर ख•s पडून ते भाग खचण्याच्या संभाव्य कारणांवर बोलताना कुतिन्हो म्हणाले की ‘बॅकफिलिंग’दरम्यान अयोग्य ‘कॉम्पॅक्शन’ हे एक संभाव्य कारण असू शकते. तथापि, मॅनहोल्स/वाहिनीमध्ये गाळ शिरल्यामुळे रस्ते खचत असतील, तर त्याचे दीर्घकाळात मोठे विपरित परिणाम होऊ शकतात. मी स्वत: सिव्हिल अभियंता असल्याने हे सांगू शकतो, असे त्यांनी पुढे सांगितले. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भू-गटार वाहिनीच्या कामांवर लक्ष ठेवत आहोत. तसेच निकृष्ट कामे कोणत्या पद्धतीने केली जातात हे सातत्याने संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे, असे ते म्हणाले. ‘एचडीपीई लाईन’ ज्या ठिकाणी ‘मॅनहोल्स’ला जोडते ते ‘पॉईंट्स’ बहुतेक वेळा आवश्यकतेनुसार पूर्ण केले जात नाहीत. केवळ फायद्यापोटी आधुनिक तंत्रज्ञानाशी कशी तडजोड केली जाते हे पाहणे खूप निराशाजनक आहे. यामुळे शासकीय तिजोरीचे मोठे नुकसान होते आणि सामान्य लोकांसाठी परिस्थिती जोखमीची बनते. रिंग रोडवर आणखी काही पोकळ भाग असू शकतात आणि ते कधीही खचू शकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दररोज रिंग रोडच्या पातळीचे निरीक्षण करावे, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली आहे.









