कुडाळ येथील गिरणी कामगार व वारसदारांच्या मेळाव्यात कॉ. संतोष मोरे यांची टीका
वार्ताहर।कुडाळ
आमची नाळ ही गिरणी कामगारांबरोबर जोडली गेली आहे. गिरणी कामगारांना घरे देण्याची मुख्यमंत्री व काही मंत्र्याची इच्छा आहे. परंतु गिरणी कामगारांनामुंबईबाहेर काढण्याचे काम काही संघटनांचे पुढारी व काही राजकीय नेते करीत आहे. गिरणी कामगारांची आज फरफट होत आहे. त्यांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. अशी टीका गिरणी कामगार मुंबईचे संघटक कॉ. संतोष मोरे यांनी शुक्रवारी येथे केली.
गिरणी कामगारांनी घाबरू जाण्याचे कारण नाही. पात्रता निश्चित करणे ही आपली जबाबदारी आहे. जास्तीत जास्त गिरणी कामगारांनी 16 डिसेंबर पर्यंत गुगल अँपच्या माध्यमातू ऑनलाईन अर्ज भरून म्हाडाकडे पात्रता निश्चित करावी, असे आवाहनही त्यांनी केले.सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्या वतीने शुक्रवारी कुडाळ रेल्वे स्टेशन येथील सिद्धि विनायक सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख संघटक शांताराम परब, कॉ.अनंत मालप, सुनील निचम, आनंद भोगण, गिरणी कामगार व वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.संतोष मोरे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती. गिरणी कामगारांना न्याय मिळाला नाही तर मुंबईच बंद करेन. परंतु त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. आजपर्यंत हे गरणी कामगार वंचितच राहिले आहेत . 1982 साली गिरणी कामगारांना 200 एकर जागेत घरे द्यायचे सरकारने मान्य केले होते. परंतु आता 19 एकर एवढी जागा शिल्लक राहिली आहे. ही जागा गेली कुठे ? असा सवाल त्यांनी केला. गिरणी कामगारांना घरे मिळवू नये अशी काही संघटनांची व सरकारची इच्छा आहे.
आता यापुढे मात्र पात्र असलेल्या गिरणी कामगाराला घरे ही मिळणारच आहेत. गिरणी कामगारावर कुठल्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही.तुम्ही कायम संघटनेसोबत राहिल्यास तुम्हाला न्याय मिळणार आहे. सत्यासाठी थोडा वेळ लागतो. परंतु यश नक्कीच मिळते. मुंबई मधील इंदूर मिलच्या गिरणी कामगारांच्या जागेत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधले आहे . त्याला आमचा विरोध नाही. परंतु त्याबदल्यात गिरणी कामगारांना कुठली जागा देण्यात आली. आज गिरणी कामगारांच्या जागा सरकार घेत आहे.मुंबई मध्ये दोन दसरा मेळावे झाले. त्यात काय झाले? एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम सरकारने केले. गिरणी कामगारांच्या मागण्यांबाबत कोणी काही बोलले नाही. आम्ही कुठल्याही पक्षाचा द्वेष करत नाही, परंतु जे सत्य आहे तेच सांगतो. हे सरकार जनतेच्या दारी आले पाहिजे. त्याचबरोबर गिरणी कामगारांच्यासुद्धा दारी आले पाहिजे. गिरणी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत . 1982 साली गिरणी कामगार मुंबई सोडून गावी आला. आज म्हाडाकडून गिरणी कामगारांकडे एक – दोन नव्हे, तर 13 प्रकारचे पुरावे मागितले जात आहेत. हे कितपत योग्य आहे. म्हाडाचे सुनील राणे व श्री. महाजन यांना गिरणी कामगारांच्या मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. गिरणी कामगारांनी घाबरू जाण्याचे कारण नाही. गिरणी कामगारांना मुंबईत घरे ही मिळणारच आहेत. आमची बांधिलकी ही कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही. तर ती गिरणी कामगारांशी आहे. असे त्यांनी सांगितले. शांताराम परब व कॉ .अनंत मालप यांनीही मार्गदर्शन केले.या मेळाव्यात म्हाडाकडून गिरणी कामगार व वारसदारांच्या ऑनलाईन पात्रता निश्चिती करण्याकरीता व अर्ज भरण्याबाबत जाहीर करण्यात आलेल्या सूचनेची माहिती देण्यात आली. तसेच सदर ऑनलाईन अर्ज भरताना येणा-या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत माहिती देण्यात आली.









