तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याबाबत महापालिका गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप जनतेतून होत आहे. याबाबत आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांच्याशी संपर्क साधला असता सध्या आम्ही कुत्र्यांची नसबंदी करण्याकडे लक्ष दिले आहे. मात्र कुत्र्यांची संख्या वाढत चालल्यामुळे समस्या जैसे थे राहत आहे. यापुढेही नसबंदी मोहीम राबविली जाईल, असे त्यांनी सांगितले.
कंग्राळ गल्ली येथे एका कुत्र्याने पुन्हा काहीजणांचा चावा घेतला आहे. विद्यार्थ्यांना तसेच वृद्धांनादेखील या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे कंग्राळ गल्ली परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू, असे आश्वासन देण्यात आले आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. खासबाग, टिळकवाडी, भाग्यनगर याचबरोबर शहरातील मध्यवर्ती भागामध्येही कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी ये-जा करणे अवघड झाले आहे. विशेषकरून विद्यार्थ्यांवरही कुत्री हल्ला करत आहेत. तेव्हा तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
महानगरपालिकेने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे. नगरसेवकांनीही याबाबत सभागृहामध्ये आवाज उठवून संबंधितांना योग्य ती सूचना करावी. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे भटकी कुत्री आडोसा शोधण्यासाठी काहीजणांच्या कंपाऊंडमध्ये ठाण मांडून बसत आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी गेले असता हल्ला करत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. तेव्हा याबाबत महापालिकेने लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









