कौन्सिल विभाग आता कोणती भूमिका घेणार?
बेळगाव : महानगरपालिकेतील निधीचे सर्व नगरसेवकांना समांतर वाटप करावे, अशी मागणी विरोधी गटाच्या नगरसेवकांनी महापौर सविता कांबळे यांच्याकडे केली होती. मात्र या प्रकरणी त्यांनी दखल घेतली नाही. यामुळे शनिवार दि. 17 रोजी होणाऱ्या बैठकीच्या नोटिसा विरोधी गटाच्या काही नगरसेवकांनी स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांची चांगलीच गोची निर्माण झाली आहे. आता सत्ताधारी गट नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे पहावे लागणार आहे.
महानगरपालिकेतील 30 कोटीचा निधी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी वाटून घेतला आहे. विरोधी गटातील एकाही नगरसेवकाला त्या निधीतील रक्कम मंजूर केली नाही. त्यामुळे तातडीने महापौर सविता कांबळे यांना भेटून याबाबत माहिती देण्यात आली होती. दोन दिवसात त्यावर तोडगा काढू असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे विरोध गटाच्या नगरसेवकांनी आता त्या नोटिसा स्वीकारल्या नाहीत.
शनिवार दि. 17 रोजी बैठक होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील कौन्सिल विभागाने सर्व 58 प्रभागांच्या नगरसेवकांना त्या नोटिसा पाठविल्या होत्या. मात्र नगरसेवकांनी नोटिसा घेण्यास नाकारल्या आहेत. त्यामुळे आता कौन्सिल विभाग कोणती भूमिका घेणार आहे. की मागील वेळी ज्याप्रमाणे घरांवर नोटिसा चिकटविण्यात आल्या होत्या. त्या प्रकारे चिकटविणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकूणच निधी वाटपावरून महानगरपालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे.









