जुलैचा निधी अद्याप खात्यावर नाही
बेळगाव : सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. यापैकी शक्ती, गृहज्योती, अन्नभाग्य योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रति माणसी 170 रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून ही रक्कम जमा केली जात आहे. मात्र अद्यापही बरेच लाभार्थी या निधीपासून वंचित असल्याचे दिसत आहे. ऑगस्ट आला तरी अद्याप जुलैचा निधी मिळाला नसल्याने लाभार्थी नाराज झाले आहेत. अन्नभाग्य योजनेंतर्गत पाच किलो धान्याबरोबर प्रति व्यक्ती 170 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत. जुलै महिन्यापासून अंमलबजावणी सुरू असली तरी अद्याप बरेच जण या निधीपासून वंचित राहिले आहेत. बँकला आधार लिंक, रेशन कार्ड अपडेट इतर सर्व शासकीय कागदपत्रे असूनदेखील या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत बँकेत चौकशी केली असता आधार लिंक असल्याचे सांगितले जाते. शिवाय अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे चौकशी केली असता ई-केवायसी असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र निधी का जमा होत नाही? त्यामुळे लाभार्थी चिंतेत आहेत. सर्व कागदपत्रे सुरळीत असूनदेखील जुलै महिन्यातील रेशनचा पैसा मिळाला नसल्याने आता काय करावे, असा प्रश्न सतावू लागला आहे. सरकारला तांदळाचा साठा कमी पडल्याने लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पैसा दिला जातो. मात्र काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात महिना उलटला तरी निधी जमा झाला नाही. त्यामुळे लाभार्थी बँक व अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या पायऱ्या झिजवू लागले आहेत. मात्र अद्याप आपल्या बँक खात्यात रक्कम का जमा झाली नाही. याबाबत लाभार्थ्यांना काही समजेनासे झाले आहे. त्यामुळे आता कोठे व कोणाकडे विचारायचे, असा प्रश्नदेखील लाभार्थ्यांना पडला आहे.









