जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा आदेश : सफाई कर्मचारी जागृत दल समितीची बैठक
बेळगाव : सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आनंदवाडी शहापूर येथे पी. के. क्वॉर्टर्स तसेच नेहरुनगर व अझमनगर येथील पी. के. क्वॉर्टर्समध्ये योग्य त्या सोयी-सुविधा लवकरात लवकर पुरवाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे. सफाई कर्मचारी जागृत दल समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत समितीच्या सदस्यांसमवेत त्यांनी सविस्तर चर्चा केली. आनंदवाडी येथील पी. के. क्वॉर्टर्समध्ये लवकरात लवकर जीम, वाचनालय सुरू करावे तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या तीनही पी. के. क्वॉर्टर्समध्ये पाणीटंचाई निर्माण होणार नाही. याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. पी. के. क्वॉर्टर्सची पाहणी करण्याचा आदेश त्यांनी अभिषेक कंग्राळकर यांना दिला. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याची सूचना समाज कल्याण अधिकारी रामनगौडा यांना करण्यात आली. महेश माळगी या मागासवर्गीय सफाई कर्मचाऱ्यांची पदोन्नती कित्येक महिन्यापासून झालेली नाही. याकडे लक्ष वेधता जिल्हाधिकाऱ्यांनी 8 दिवसांमध्ये त्याची पदोन्नती झाली पाहिजे, असा आदेश बजावला.
सामुग्री घेण्यासाठी एकलाख रुपये
सफाई कर्मचारी समितीमधील दिवंगत सदस्याच्या जागी मुनीस्वामी भंडारी यांचा समावेश करावा, या मागणीची दखल घेऊन तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला. सफाई कर्मचाऱ्यांना गृहभाग्य योजना, पी. के. क्वॉर्टर्समध्येच निवास किंवा खुली जागा या तीन पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्यही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याशिवाय सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची सूचना करून तेथे कार्यालयीन सामुग्री घेण्यासाठी एकलाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले. या बैठकीला माजी नगरसेवक व समितीचे पदाधिकारी दीपक वाघेला, मुनीस्वामी भंडारी, षण्मुख आदियेंद्र, राममोहन साके व विजय निरगट्टी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.









