बेळगाव संघटनेच्यावतीने अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : जिल्ह्यामध्ये रेशन कार्डधारकांना धान्य वितरण करणाऱ्या रेशन वितरकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने या समस्येची दखल घेऊन धान्य वितरण करणाऱ्यांच्या समस्या निकालात काढाव्यात, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य सरकारी रेशन वितरक संघ बेळगाव यांच्यातर्फे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जिल्हा व्यवस्थापक अरविंद बेल्लद यांना निवेदन देण्यात आले. रेशन कार्डधारक व सरकारमध्ये समन्वयांनी काम करणाऱ्या रेशन वितरकांना गेल्या अनेक महिन्यापासून कमिशन देण्यात आलेले नाही. त्यामुळे रेशन वितरक आर्थिक अडचणीत आले आहेत. चार महिन्यांपासून कमिशन देण्यात आलेले नाही.
सदर कमिशन त्वरित अदा करण्यात यावे, रेशन वितरण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्याने वितरकांना सर्व्हर डाऊनच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागत आहे. यामधील दोष दूर करून वितरकांना सुरळीत वितरण प्रक्रिया राबविण्यास मदत करावी. निगेटिव्ह सेबी धान्य वितरणामध्ये समस्या दूर करण्यात याव्या, रेशन वितरकांना अतिरिक्त धान्य देऊन सहकार्य करण्यात यावे, प्रत्येक महिन्याला बँक खात्यावर कमिशन जमा करण्यात यावे, अशा मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य सरकारी रेशन वितरक क्षेमाअभिवृद्धी संघाचे राज्य उपाध्यक्ष राजशेखर तलवार, कार्यदर्शी दिनेश बागडे, तालुका अध्यक्ष मारुती आंबोळकर, नारायण कालकुंद्री, सुरेश राजूकर, सागर राजाई आदी उपस्थित होते.









