मनपा आयुक्तांना निवेदन
बेळगाव : कणबर्गी रोडवरील सुरभी हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या नगरामध्ये विविध समस्या भेडसावत आहेत. त्या समस्या दूर करण्यासाठी तेथील रहिवासी संघटनेच्यावतीने महानगरपालिका आयुक्तांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. या नगरातील समस्या तातडीने सोडवा, अशी मागणी नागरिकांनी यावेळी आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली आहे. रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्या रस्त्यांची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. रात्रीच्यावेळी ये-जा करताना समस्या निर्माण होत आहे. महत्त्वाचे म्हणजे यापरिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. पथदीपही नाहीत, त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सध्या पावसामुळे तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, तातडीने या नगराची पाहणी करावी आणि येथील समस्या सोडवाव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे.
समस्या सोडविण्याचे आश्वासन
पाणी पुरवठादेखील वेळेत केला जात नाही. त्यामुळे पाण्याचीही समस्या गंभीर बनली आहे. सध्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा करावा, याचबरोबर डास प्रतिबंधक औषधाची फवारणीदेखील करावी, अशी मागणीही करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी निवेदन स्वीकारुन या समस्या सोडविण्याबाबत पाऊल उचलले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी हणमंत दुंडी, सनमत हारदी, सुरेश हंचनाळ, जी. पी. असोदे, ए. व्ही. हळदणकर, बी. बी. मत्तीकट्टी, जी. जी. साली, आर. आय. हंपण्णावर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.









