कणबर्गी येथील केएचबी कॉलनीतील रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कणबर्गी येथील केएचबी कॉलनीमध्ये पाणी, ड्रेनेज, रस्ते, गटारी या समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी अनेकवेळा निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांना निवेदन दिले आहे. कणबर्गी येथील केएचबी कॉलनीकडे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पाईपलाईन घालण्यात आली होती. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या कॉलनीमध्ये अनेक समस्या आहेत. मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. अचानक वीजपुरवठा खंडित केला जातो. बऱ्याचवेळा अधिक दाबाने वीजपुरवठा होत असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे अनेकवेळा नुकसान झाले आहे. या कॉलनीपासून केवळ 100 मिटर अंतरावर जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. हा परिसर निसर्गरम्य आहे. या परिसराचा विकास होणे गरजेचे आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी एस. आर नेगिनहाळ, बी. एन. बडिगेर, एस. बी. हिरेमठ, रामा पाटील, बाबासाहेब देसाई, पिराजी भोसले, सुरेश खोत, चंद्राप्पा चौगुला, बसवराज दयाण्णावर, सी. बी. पुजेरी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.









