चेंबर ऑफ कॉमर्सची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव शहराला उद्यमबाग, अनगोळ, मजगाव येथील औद्योगिक वसाहत जोडण्यासाठी तिसरे रेल्वेगेट महत्त्वाचे ठरते. परंतु, रेल्वे उड्डाणपुलाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. याचा परिणाम उद्योगांवरही होत असून कामगारांचे वरचेवर अपघात होत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाशी संवाद साधून तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील खड्ड्यांची डागडुजी करा, अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्यावतीने रेल्वेमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
बेळगावला स्मार्ट रेल्वेस्थानक देण्यात आले. परंतु, फूटओव्हरब्रिजचे काम सुरू असल्याने प्रवाशांना एकाच जिन्यावर अवलंबून रहावे लागत आहे. हा फूटओव्हरब्रिज रेल्वेस्थानकाच्या एका कोपऱ्यात असल्यामुळे संपूर्ण रेल्वेस्थानकाला वळसा घालून प्लॅटफॉर्म क्र. 2 व 3 गाठावे लागत आहे. त्यामुळे फूटओव्हरब्रिजचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, उपाध्यक्ष स्वप्निल शहा, उदय जोशी, सतीश कुलकर्णी, मनोज मत्तीकोप, संजय पोतदार, विजय दरगशेट्टी, आनंद देसाई यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बेळगावहून मुंबईसाठी रेल्वे सुरू करा…
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. बेळगावमधील उद्योजकांचे मुंबईला नेहमी येणे-जाणे होत असते. परंतु, रात्रीच्यावेळी एक्स्प्रेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रात्री 9 वाजता मुंबईला निघण्यासाठी ओव्हरनाईट रेल्वे सुरू करावी, तसेच बेळगावमधून निघणाऱ्या एक्स्प्रेसचा कोटा वाढवावा, अशी मागणी करण्यात आली.









