प्रतिनिधी /बेळगाव
असंघटित कामगारांवर नेहमीच अन्याय होत आहे. सरकारचे या असंघटित कामगारांचे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. कामगारांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, कामगारमंत्री यांना अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र केवळ आश्वासने दिली गेली आहेत. त्यामुळे राज्यातील 25 लाख कामगार कुटुंबांवर अन्याय होत असून सामाजिक समतोल राखण्यासाठी कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा असंघटित कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कामगारांना कोणीच वाली नाही. कामगारांची पिळवणूक होत आहे. सरकारकडून मिळणाऱया योजना त्यांना मिळणे कठीण झाले आहे. याबाबत अनेकवेळा सरकारकडे पाठपुरावा केला आहे. कामगार मंत्र्यांना निवेदने दिली आहेत. मात्र कामगार मंत्री शिवराम हेब्बार हे कामगारांच्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. केवळ आश्वासने देत आहेत. त्यामुळे आता राज्यातील 25 लाख कामगार कुटुंबे अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत त्यांना हिसका दाखविला जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजेश शेरखान, शंकर भंगी, राजू दळवाई, एम. बी. पाटील, महांतेश पाटील, गुरुपाद कोलकार, आनंद कांबळे यांच्यासह कामगार उपस्थित होते..









