ग्रा.पं. नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांना ग्रामस्थांचे निवेदन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला. गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी परत अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. परंतु मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये गावामध्ये अनेक विकासकामांच्या समस्या आवासून थांबल्या आहेत. नूतन ग्रा. पं. अध्यक्षा व उपाध्यक्षांसह सर्व सदस्यांनी त्वरित लक्ष देऊन गावच्या समस्या सोडवून गावचे नंदनवन करून नागरिकांना दिलासा देण्याच्या आशयाचे निवेदन कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने अध्यक्षा कौसरजहाँ सय्यद, उपाध्यक्षा दीपा पम्मारसह इतर सदस्यांना शुक्रवारी देण्यात आले.
गावातील सोलर दिवे बंद असून ते सुरू करावेत, रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याचा निचरा करावा, कंग्राळी-यमनापूर मुख्य रस्त्यावर पडलेला मोठा ख•ा बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा. गावचे जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता वाहतुकीला कुचकामी बनला आहे. या रस्त्याचीही त्वरित दुरुस्ती करावी, गावचा मध्य चौकामध्ये आरओ प्लांट बसवून नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी,नदीकाठावरील सार्वजनिक विहिरीचे पाणी नळाना सोडू नये, विठ्ठल-रखुमाई मंदीरसमोरील विहिरीचे पाणी सार्वजनिक नळांना सोडण्याची मागणी शाहूनगर, कंग्राळी बुद्रुक रस्त्यावरील मोठमोठे ख•s बुजवून रस्ता वाहतुकीला सुरळीत करावा अशा अनेक समस्या तथा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी मल्लाप्पा पाटील, राजू मन्नोळकर, निरंजन जाधव, शंकर कोनेरी, शिवा कोळी व गावातील विविध युवक मंडळांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









