माजी नगरसेवक संघटनेचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
बेळगाव : महानगरपालिकेत इतिवृत्त असणारी फाईल गायब झाल्यानंतर अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. प्रकरण पोलीस स्थानकात गेले आहे. यामुळे शहराच्या विकासावर परिणाम झाला असून महानगरपालिकेच्या घडामोडींकडे लक्ष घालून वाद मिटविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक संघटनेतर्फे प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांना देण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेला मोठा इतिहास आहे. त्यामुळे महानगरपालिकेची गरिमा राखणे आवश्यक आहे. फाईल गायब झाल्याच्या प्रकरणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. याप्रकरणी कौन्सिल अधिकाऱ्यांनी मार्केट पोलीस स्थानकात महापौरांवर तक्रार दाखल केली आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदाच महापौरांवर अशाप्रकारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे शहराचे प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय नसल्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तर विकास कामांवरही परिणाम झाला आहे.
महानगरपालिकेला करवाढ करण्यावरून सरकारकडून नोटीस बजावण्यात आली होती. करवाढ करण्यासंदर्भातील फाईल गायब झाल्याने याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे अधिकारी व महापौरांमध्ये वाद पेटला आहे. तर महापौरांनीही मनपा आयुक्तांविरोधात संबंधित खात्याकडे तक्रार दाखल केली आहे. फाईल गायब झाल्याप्रकरणी महापौरांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याने वाद अधिकच चिघळला आहे. यासाठी प्रादेशिक आयुक्तांनी जातीने लक्ष घालून प्रकरणावर तोडगा काढावा व मनपाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अॅड. नागेश सातेरी, मालोजीराव अष्टेकर, शिवाजी सुंठकर, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, मोहन बेळगुंदकर, वंदना बेळगुंदकर, संजीव प्रभू, संभाजी चव्हाण, लतिफखान पठाण, माजी आमदार रमेश कुडची, शांता उप्पार यांच्यासह माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









