कोल्हापूरचे भाजपचे नेते संग्रामसिंह कुपेकर : बेळगावमध्ये माध्यमांशी साधला संवाद
बेळगाव : बेळगाव हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. परंतु येथील मराठी भाषिकांवर दडपशाही केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने ज्याप्रकारे महाराष्ट्र-तेलंगणाचा सीमाप्रश्न सोडवून 14 गावे महाराष्ट्रात सामील केली. याच धर्तीवर बेळगावमधील 865 गावांना महाराष्ट्रात सामील करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती कोल्हापूरचे भाजपचे नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी दिली. शुक्रवारी एका खटल्यासाठी ते बेळगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील नेतेमंडळी बेळगावात आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. भगवा ध्वज लावला तरी गुन्हे दाखल केले जातात. यामुळे ही दडपशाही वेळीच रोखणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कन्नडसक्ती करणे अयोग्यच आहे. सीमाभागात होणाऱ्या मराठी भाषिकांच्या प्रत्येक आंदोलनाला महाराष्ट्रातील मराठी माणसाचा नेहमीच पाठिंबा आहे. त्यामुळे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मराठी माणसाची शिवसेना साथ सोडणार नाही, असे शिवसेनेचे कोल्हापूरचे नेते सुनील शिंत्रे यांनी सांगितले. अॅड. संतोष मळविकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यापूर्वी त्यांनी धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, आनंद आपटेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.









