उद्योजकांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली फाऊंड्री क्लस्टर हॉलमध्ये बैठक : 15 सप्टेंबरला पुन्हा प्रगतीचा आढावा घेणार
बेळगाव : ई-खातामुळे उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नियम व अटी याबाबत स्पष्टता दिली पाहिजे. व्यापार परवान्यांबाबत महामंडळाकडून गोंधळ निर्माण होत असून दररोज काही ना काही समस्या आ-वासून पुढे येत आहेत. यामुळे उद्योगांकडे लक्ष देणे कठीण झाले आहे. याबाबत सरकारी पातळीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. विशेषत: औद्योगिक क्षेत्राबाबत महानगरपालिकेच्या दुर्लक्षाबद्दल बैठकीत तीव्र आक्षेप घेण्यात आले. फाऊंड्री क्लस्टर हॉलमध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. औद्योगिक प्रतिसाद (ग्रिव्हेन्सिस), सिंगल विंडो, सीएसआर फंड, कौशल्य विकास, पंतप्रधान विश्वकर्मा योजना आणि पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजना या मुद्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी 15 सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक घेऊन या संदर्भातील प्रगतीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.
दोन फीडर लाईन बदलण्याचे निर्देश
औद्योगिक क्षेत्रात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. सर्वत्र सांडपाणी असल्याने नाल्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योगपतींनी तीव्र आक्षेप व्यक्त केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 2 फीडर लाईन बदलण्याचे आणि आवश्यक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर बसवण्याचे कडक निर्देश संबंधित विभागाला दिले. पथदीपांची देखभाल योग्यरित्या होत नसल्याचीही तक्रार करण्यात आली. संबंधित खात्याने याबाबतचे कार्य हाती घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच कर्नाटक लघुउद्योग विकास मंडळाच्या स्पाक यार्ड आणि कणबर्गी औद्योगिक वसाहतीची हस्तांतरण प्रक्रिया त्वरित पूर्ण करून करवसूल करण्याचे निर्देश देण्यात आले.
उत्तरेकडे अग्निशमन दल उभारण्यासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश
बेळगावच्या उत्तरेकडील भागात अग्निशमन दल उभारण्यासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. होनगा औद्योगिक क्षेत्रातून वाहनांना थेट महामार्गावर यावे लागत असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे तपासणी करण्याचे व सर्व्हिस रोडने वाहनांना महामार्गावर येऊ न देण्याचे निर्देश प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन यांना देण्यात आले. कणगला औद्योगिक क्षेत्रासाठी एक अंडरपास बनविण्याची सूचनाही देण्यात आली. यावेळी जि. पं. सीईओ राहुल शिंदे, नगरविकास प्राधिकरणाचे आयुक्त शकील अहमद, महापालिका आयुक्त बी. शुभा, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळ्ळी, सचिव सतीश कुलकर्णी यांच्यासह विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व समस्या निर्धारित वेळेत सोडविणार
उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजकडून निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व समस्या निर्धारित वेळेत सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले. बैठकीला प्रतिसाद दिल्याबद्दल चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.









