मंत्री नीलेश काब्राल यांचा अधिकाऱ्यांना आदेश, : म्हापशातील जनता दरबारात अधिकाऱ्यांच्या उत्तरावर संतप्त
म्हापसा : म्हापसा उपजिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या जनता दरबार कार्यक्रमास सोमवारी म्हापशात उदंड प्रतिसाद लाभला. सकाळी 10 वा. सुरू झालेला जनता दरबार सायं. 4 वा. संपला. सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी बार्देश तालुक्यातील जनतेच्या समस्यासंबंधी पाणी पुरवठा खाते, वीज खाते व जलसंचलन खात्याच्या अधिकाऱ्यांना बरेच धारेवर धरले. आज जनता दरबारात झालेल्या समस्या आठ दिवसाच्या आत सोडवाव्यात. काही तक्रारी तर आजच सोडवा, त्याचा अहवाल आपल्यास सायंकाळपर्यंत द्यावा, असा स्पष्ट आदेश दिला. विशेष म्हणजे सकाळी 10 वा. सुरू झालेला दरबार सायं. 4 वा. संपुष्टात आला. या दरबारात सुमारे 600 नागरिक होते. त्यातील एकूण 50 जणांनी आपल्या समस्या मांडल्या. शिवोली मतदारसंघातून सर्वात जास्त समस्या ऐकायला मिळाल्या. साळगाव मतदारसंघातून एकही समस्या नाही. भोजन न करता वा अधिकाऱ्यांनाही काही खायला न देता सलग 6 तास जनता दरबार चालवित मंत्री काब्राल बरेच आक्रमक झाले होते. आपल्या खात्यातील अधिकारी, अभियंता वर्ग कामचुकारपणा केल्यास त्यांनी घरी जाण्याची तयारी ठेवावी असा स्पष्ट इशाराही दिला.
काही प्रश्न प्रामुख्याने सोडविले जातील
जनतेच्या काही समस्या प्रामुख्याने सोडविण्यात येतील. हणजूण, आसगाव भागात पाण्याची प्रमुख समस्या असून ती आपण सोडविणार आहे. येत्या वर्षभराच्या कालावधीत येथे पाण्याची समस्या सोडविण्यात येईल. आपण हे प्रश्न वैयक्तिक सोडविणार. जेथे पाणी नाही तेथे नवीन पाईप लाईन घालण्यात येईल, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले.
हणजूण, कळंगूट, बागा भागात पाण्याचा व रस्त्याचा प्रश्न आहे. काही ठिकाणी रस्ते दुर्लक्षित झाले आहेत. रस्त्यावर मोठे ख•s पडले आहेत मात्र अभियंता वर्ग याकडे लक्ष देत नाही, असा आरोप कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी केला असता त्या अभियंता वर्गास मंत्री काब्राल यांनी बरेच धारेवर धरले. येत्या दोन दिवसात यावर उपाययोजना काढून त्याचा अहवाल आपल्याला देण्याचा आदेश मंत्री काब्राल यांनी दिला. सीआरझेड अंतर्गत 1999 साली तयार केलेला पहिला आराखडा बरोबर नाही. त्यानंतर 2011 साली केलेल्या दुसऱ्या आराखड्याची सर्वोच्च, उच्च न्यायालय देखरेख करते मात्र आमच्याकडे त्याबाबत डेटा नाही. किनारी भागातील घरांचे बांधकाम 1991, 1996 वा कधी केले हे कुणालाच माहीत नाही. आमच्याकडे त्याचा काहीच अहवाल नाही. त्यामुळे आता 2019 च्या आराखड्यानुसार सर्व घरे कायदेशीरच असणार आहेत, असे मंत्री काब्राल यांनी स्पष्ट केले. आजच्या जनता दरबारात सुमारे अनेक लोकांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. त्या आपण फोन नंबरसह नोंद करून घेतल्या असून त्या प्रामुख्याने अधिकाऱ्यांमार्फत सोडविण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी मंत्री काब्राल यांनी दिली.
जनता दरबार फक्त जनतेसाठी
काही आरटीआय कार्यकर्ते आपल्या वैयक्तिक समस्या घेऊन आले होते. समस्या अवश्य मांडायच्या मात्र दुसऱ्यांना धमकी वा त्रास करून हे चालणार नाही. व आपण तसे कधीच करू देणार नाही, असे स्पष्ट इशारा मंत्री काब्राल यांनी दिला. जनता दरबार आरटीआय कार्यकर्त्यांसाठी आम्ही केला नसून तो जनतेसाठी केला आहे, असेही त्यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषणसाठी मशिन आहे मात्र ते खूप महागडे आहे. याबाबत आपण प्रत्येक पोलीस स्थानकाला तपासणी करण्यासाठी आदेश दिला आहे. प्र्रशासनातील अधिकाऱ्यांकडून विविध कामांसाठी होणारी दिरंगाई म्हापशातील जनता दरबार कार्यक्रमातून दिसून आली. कुराठी से पत्रादेवीपर्यंत महामार्गावर साचणाऱ्या पाण्याची समस्या, महामार्गावर येणारा मातीचा भराव, नादुऊस्त रस्त्यांबाबत लोकांच्या तक्रारी ऐकून तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश मंत्री निलेश काब्राल यांनी दिले.
शंकर पोळजी यांनी महार्गावर वाहन चालकांना होणाऱ्या विविध अडचणी
मांडल्या. पेडे येथील जंक्शनवर होणाऱ्या अपघातांचा अहवाल सादर करण्याची सूचना उपअधीक्षकांना केली. गिरीतील सेवा रस्त्यावरील जलवाहिनी दुसऱ्या जागी घालण्याचे आदेश काब्राल यांनी दिले. यावेळी अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याने काब्राल यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच एका कनिष्ठ अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार डिलायला लोबो, मायकल लोबो, केदार नाईक, अॅड. कार्लुस आल्वारीस फरेरा, नगराध्यक्ष प्रिया मिशाल, जिल्हाधिकारी मामू हेगे, उपजिल्हाधिकारी यशस्वीनी बी, अधीक्षक शोबीत सक्सेना, निधीन वाल्सन व उपअधीक्षक जिवबा दळवी आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, नगरसेवक अॅङ शशांक नार्वेकर, अॅङ तारक आरोलकर, शंकर पोळजी, आनंदी साळगावकर, आसगाव सरपंच हनुमंत नाईक, काणका सरपंच आरती प्रवीण च्यारी, मनोज कोरगावकर, दिगंबर कळंगुटकर, अशोक आर्लेकर, प्रवीण च्यारी, संजय बर्डे, उपअधीक्षक जिवबा दळवी, अनिल केरकर, मयडे पंच सतीश गोवेकर, गजानन नाईक आदी मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.









