18 मार्चपासून यात्रेस प्रारंभ : यात्रा कमिटीला ग्राम पंचायत सर्वतोपरी सहकार्य करणार
वार्ताहर/सांबरा
हलगा येथे दि. 18 मार्चपासून होणारी श्री महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. यासाठी ग्रामस्थांनीही ग्रामपंचायत व यात्रा समितीने केलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत व देवस्थान पंच समितीच्या झालेल्या बैठकीत करण्यात आले. यात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी गजपती होत्या. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी विजयालक्ष्मी तेग्गी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. येथे 18 ते 26 मार्चपर्यंत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा होणार आहे. सदर बैठकीमध्ये यात्राकाळात नागरिकांच्या प्राथमिक सोयीबद्दल चर्चा करण्यात आली.
नागरिकांच्या पाण्याची समस्या, तसेच यात्राकाळात बाहेरून येणारे पै पाहुणे मंडळींसाठी पार्किंगची व्यवस्था, यात्रा काळात होणाऱ्या कचऱ्याची समस्या, विजे संदर्भाबाबत समस्या, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी वैद्यांची व्यवस्था करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. व यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरविण्यात आले. यात्राकाळातील समस्या सोडविण्यासाठी लक्ष्मी मंदिर आवारात व ग्राम पंचायत कार्यालय येथे एक स्वतंत्र कक्ष स्थापण्यात येण्याचेही ठरविण्यात आले. या बैठकीत यात्रा समितीच्या सदस्यांनी व ग्राम पंचायत सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी हलगा ग्रा. पं. उपाध्यक्ष चेतन कुरंगी, सदस्य गणपत मारिहाळकर, सदानंद बिळगोजी, देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष धाकलू बिळगोजी, उपाध्यक्ष चाऊकिर्ती, सैबन्नावर, मोनापा घोरपडे, पिराजी मोरेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान पंचकमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









