मनपा आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : गणेशोत्सव केवळ 12 दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रभाग स्वच्छ करण्यावर भर द्या. ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत ती तातडीने पूर्ण करा. रस्त्यांची दुरुस्ती करा, अशी सूचना आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी आरोग्य निरीक्षकांना व इतर अधिकाऱ्यांना केली आहे. बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना विविध सूचना करण्यात आल्या. प्रत्येक वॉर्डामध्ये नगरसेवक उपस्थित राहून स्वच्छता करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तेव्हा अधिकाऱ्यांनी यासाठी सहकार्य करावे. जेणेकरून वॉर्ड पूर्णपणे स्वच्छ होईल. याचबरोबर वॉर्ड क्रमांक 21 व 22 मध्ये डुकरांचा वावर वाढला आहे. तेव्हा संबंधित डुकरांच्या मालकांना योग्य ती सूचना करण्यासाठी पाऊल उचलावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आता यापुढे सणांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहर स्वच्छ करण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या. दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांतील सर्व वॉर्ड स्वच्छ करण्यासाठी साऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांनीही त्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगण्यात आले. 168 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती कोणी केली? याचा सविस्तर अहवाल तयार करा, असेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीला आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांसह काही नगरसेवक, आरोग्य निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.









