प्रतिनिधी/ सातारा
अलिकडच्या पाच ते सहा वर्षापासून गोडोली तळय़ाच्या परिसरात काळींबीचा ओढय़ाला पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात येत असल्याने पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होत होती. यावर्षीही तशी परिस्थिती होवू नये म्हणून गोडोली तळय़ाला इनलेट आणि आऊटलेट करण्याची सोय करण्यात आली. हे काम आमदार शिवेंद्रराजेंच्यामुळे करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी पत्रकारांना दिली.
उन्हाळय़ात या कामाचा शुभारंभ करताना अशोक मोरे, बाळासाहेब मामुलकर, पोपटराव मोरे, युवराज जाधव, राजू मोरे, रवी अहिरे, सुभाष मोरे, शशिकांत मोरे, चारुदत्त सपकाळ, सागर मोरे यांनी नारळ फोडून केले. गेल्या पाच वर्षापूर्वी गोडोली तळय़ाचे सुशोभिकरण करण्यात आले. त्यानंतर गोडोली तळयाच्या परिसरातच पाणी तुंबण्याचा प्रकार घडू लागला. तेथील घरांमध्ये, दुकानात पाणी शिरण्याचे प्रकार घडू लागले. नागरिकांच्या मागणीनुसार आमदार शिवेंद्रराजेंच्याकडे तत्कालिन नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी विनंती करताच लगेच त्यावेळी आमदार शिवेंद्रराजेंनी भेट देवून पाहणी केली होती. तळय़ातून पाणी बाहेर काढून देण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. मुख्याधिकारी अभिजित बापट आणि नगरअभियंता दिलीप चिद्रे यांनी याची पाहणी उन्हाळयात केली होती. तेव्हाच लगेच त्यांनी काम करण्याच्या सुचना दिल्या आणि इनलेट आऊट लेटचे काम करुन घेतले. त्यामुळे यावर्षी पावसाळय़ात धोका उदभवला नसल्याचे माजी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.








