रवींद्र केसरकर, कुरुंदवाड
Kolhapur News : मैत्रीच्या आपण अनेक कथा ऐकल्या अन् वाचल्याही असतील. मग ती भगवान श्रीकृष्ण अन् सुदामाची कथा असो की शोले चित्रपटामधील जय-वीरुची दोस्ती… परंतु मानव व फुलपाखरू यांची मैत्री तुमच्यासाठी नवीनच असणार. आजपर्यंत अशी मैत्री पहिली किंवा ऐकलीही नसणारच… बहुतेक
शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीतील सध्या जम्मू काश्मीर येथे कार्यरत असणाऱ्या एका जांबाज सैनिकाची पत्नी आणि फुलपाखरू यांची मैत्री परिसरातच नाही. तर सोशल मीडियावर याची धूम चांगलीच रंगली आहे. सैनिक पत्नी सौ. पूजा राहुल पाटील यांच्याशी अनेक दिवसांपासून एक फुलपाखरू जवळीक करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या डोक्यावर येऊन बसणे, मुद्दाम धडकून जाणे. असे प्रसंग कित्येक दिवस सुरू होते. पण सौ. पाटील यांनी तिकडे लक्ष दिले नव्हते. पण नंतर फुलपाखरू जाणीव पूर्वक आपल्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या फुलपाखराची चक्क मैत्री संबंध जोडले. यानंतर हे फुलपाखरू गेलच नाही. त्याने कायमचे पाटील यांच्याशी मैत्रीचे नाते जोडले. आता पाटील जिथे जातील तिथे फुलपाखरू सोबत असते. त्यामुळे पाटील व ते फुलपाखरू असे मैत्रीचे एक अतूट नाते तयार झाले आहे. नेहमी ती फुलपाखरू परसातील झाडाझुडपात राहते. इतकंच नाही तर जेव्हा पाटील परसात जातात तेव्हा ते त्यांच्या अंगा खांद्यावर उडत रहाते. आणि त्यांच्या हाकेलाही साद देते.
सैनिक टाकळी गावात जवान राहुल पाटील यांच्या पत्नी पूजा राहुल पाटील या आपल्या मुलांसह कुटुंबिया सोबत राहतात. एक महिन्यांपासून त्यांना परसातील बागेमध्ये एक फुलपाखरू बागडताना नेहमी दिसायचे.ते त्यांच्याशी मौज मस्ती करण्याचा प्रयत्न करायचे. मग त्यांनीही ही त्याला जीव लावला. त्याला आपल्या घरी बोलवले. बोलवल्यावर ते घरीही आले. घरातील गोंगाट आणि मुलांच्या कडून फुलपाखरास होणारा त्रास यामुळे आता पाटील आणि त्याच्या कुटुंबीयांना आशा होती की, ते उडून जाईल, पण तसे झाले नाही.
त्यांच्या मायेने फुलपाखराने त्यांच्याशी कायमची घट्ट मैत्री केली. ते फुलपाखरू त्यांच्या घराजवळ व म्हणजे घरपरीसरातच राहू लागले. आता ते त्याच्या कुटुंबाचा सदस्यच झाले आहे. त्या जिथे जाते तिथे फुलपाखरू सोबत असते.मायेची ऊब व जिवाशी जिव लावला तर प्राणीच काय कीटक सुद्धा आपलासा होऊ शकतो हे मात्र नक्की हे या मानवप्राणी व सुंदरसे कीटक असणाऱ्या फुलपाखरू यांच्या मैत्रीवरून सिद्ध होते
मला फुलपाखरे लहानपणापासूनच फार आवडतात. सकाळी फुले ऊमलतात त्यावेळी फुलांमधील परागकणांचा आस्वाद घेत फुलपाखरांची मोजमस्ती सुरू असते. सुमारे एक महिन्यांपासून हे फुलपाखरू मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न तरी करत नसेल ना असा मला वारंवार भास होत होता. शक्यतो फुलपाखरे प्राण्यांच्या जवळ कधीच जाण्याचा प्रयत्न करत नाहीत ते उडून जातात. मग मी त्याच्याशी मैत्री केली आणि त्यानंतर ते गेलेच नाही, तेव्हापासून आजपर्यंत ते फक्त माझ्या सोभोवतीच फिरत राहते. एखाद्या किटका शी अशी मैत्री होईल, याचा विचारही केला नव्हता. आता फुलपाखरू आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे झाले आहे
सौ. पूजा राहुल पाटील









