वृत्तसंस्था / श्रीनगर
रजेवर असणाऱ्या एका सैनिकावर काश्मीरमधील त्राल येथे गोळीबार करण्यात आला आहे. सैनिकाचे नाव दिल्हेर मुश्ताक असे असल्याची माहिती देण्यात आली. तो आपल्या घरी विश्रांती घेत असताना काही अज्ञातांनी घरात प्रवेश केला आणि त्याच्यावर गोळीबार केला. ही घटना बुधवारी घडली. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार केले जात असून त्याच्या जीवाला धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तो स्थानिक सैन्यदलातील सैनिक आहे.
गोळीबार झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्वरित त्याला रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्याची स्थिती स्थिर असल्याचे आणि तो उपचारांना योग्य तो प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार सादर करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचा भाग घेरला आहे. हल्लेखोराचा शोध सुरु असून हा दहशतवादी हल्ला आहे काय, याचाही तपास केला जात आहे, अशी माहिती देण्यात आली.









