तीन सैनिक जखमी : जम्मू-काश्मीरमधील घटना
वृत्तसंस्था/ पुंछ
जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये शुक्रवारी नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) भूसुरुंगाचा स्फोट झाला असून यात भारतीय सैन्याच्या जाट रेजिमेंटचा एक सैनिक हुतात्मा झाला आहे. तर तीन सैनिक जखमी झाले असून त्यांना एअरलिफ्ट करत उधमपूर येथील सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हवेली तालुक्यातील सलोत्री गावात विक्टर पोस्टनजीक शुक्रवारी दुपारी सुमारे 12 वाजता स्फोट झाला. हे भूसुरुंग घुसखोरी रोखण्यासाठी या भागात पेरण्यात आल्याचे समजते आणि कथित स्वरुपात 07 जाट रेजिमेंटच्या सैनिकांकडून नियमित गस्त सुरू असताना याचा स्फोट झाला. एम-16 भूसुरुंगाच्या स्फोटात अग्निवीर ललित कुमार हे हुतात्मा झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सैन्य आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. भारतीय सैन्य सीमेपलिकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी या भागांमध्ये नियमित स्वरुपात गस्त घालते आणि सुरक्षा प्रोटोकॉलच्या अंतर्गत भूसुरुंग पेरले जात असतात.








