नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळला; 13 दिवसात तिसरी चकमक
वृत्तसंस्था/श्रीनगर, उरी
उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईदरम्यान एक जवान हुतात्मा झाला. या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली. गेल्या 13 दिवसांत दहशतवाद्यांशी लष्कराची ही तिसरी चकमक आहे. यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी किश्तवाडच्या दुल भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. या दरम्यान दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला होता. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमच्या (बॅट) मदतीने दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला.
उरी सेक्टरमधील टिक्का पोस्टजवळ नियंत्रण रेषेवर सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरू होता. बारामुल्ला जिह्यात नियंत्रण रेषेवर ऑपरेशनल ड्युटी दरम्यान आणखी एक जवान बनोथ अनिल कुमार हुतात्मा झाल्यानंतर ही घटना घडली. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने मंगळवारी एका पोस्टमध्ये शिपाई बनोथ अनिल कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘बारामुल्ला जिह्यात नियंत्रण रेषेवर ऑपरेशनल ड्युटी बजावताना शूर शिपाई बनोथ अनिल कुमार यांच्या मौल्यवान जीवितहानीबद्दल चिनार कॉर्प्स तीव्र शोक व्यक्त करते’, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सीमेजवळील भागात कर्फ्यू लागू
जम्मू काश्मीरमधील सांबा जिह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंतच्या भागात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जम्मू क्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानचे दहशतवादी वापरत असलेले हे क्षेत्र आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विविध भागधारकांशी चर्चा केल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या कारवायांना पाठबळ देण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी रात्रीच्या कर्फ्यूची ही नवीन व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या पंधरवड्यात तणावात वाढ
चालू महिन्याच्या प्रारंभापासून काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. 1 ऑगस्टच्या संध्याकाळी परिसरात दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. त्यापूर्वी 28 जुलै रोजी सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत लिडवासच्या जंगलात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 दहशतवाद्यांना ठार मारले होते. 31 जुलै रोजी पूंछमधील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करताना आणखी दोन दहशतवादी मारले गेले होते.









