कुलगाममधील घटना : कारमध्ये सापडल्या रक्ताच्या खुणा, लष्कर-पोलिसांकडून तपास, कुटुंबीय-नातेवाईक चिंतेत
वृत्तसंस्था/ कुलगाम
काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका जवानाचे अपहरण केले आहे. जावेद अहमद वाणी असे या जवानाचे नाव आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी त्याचे कारमधून अपहरण केले. कारमध्ये रक्ताचे डाग सापडल्याची माहिती उपलब्ध झाल्याने नातेवाईक आणि प्रशासन चिंतेत अडकले आहे. जावेदच्या पालकांनी आपल्या मुलाला सोडण्याची विनंती दहशतवाद्यांना केली आहे.
अपहृत जवान जावेद अहमद वाणीची पोस्टिंग लेहमध्ये होती. वाणी हा ईदची सुट्टी साजरी करण्यासाठी घरी आला होता. तो शनिवारी आपल्या कारने चहलगाम येथे रवाना झाला होता. मात्र, तो पोस्टिंगचा ठिकाणी न पोहोचता अनेक तास बेपत्ता राहिल्यानंतर गावातील लोकांनी त्याचा शोध सुरू केला. शोधकार्यादरम्यान कुलगामजवळील प्रणाल येथून त्याची अनलॉक केलेली कार सापडली. कारमधून जवानाची चप्पल आणि रक्ताचे डाग सापडले आहेत. लष्कराचे पथक शोधमोहीम राबवत असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
अपहृत जवान जावेदची बहिण सुमेजान हिने आपला भाऊ बेपत्ता असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाऊ महिनाभर रजेवर होता. रविवारी संध्याकाळी सहा वाजता तो सेवेवर परतणार होता. मात्र, शनिवारी रात्री आठ वाजता तो बेपत्ता झाला. त्याला कोणी घेऊन गेले याचा थांगपत्ता लागलेला नाही. आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद आहे. तो 9 वर्षांपासून सैन्यात असून त्याचे कोणाशीही वैर नाही. आम्ही कोणावरही संशय घेत नाही, असे तिने रडत सांगितले.
जावेद 2014 पासून लष्करात आहे. काल संध्याकाळी कोणीतरी त्याला त्याच्या बागेजवळून त्याच्या कारमधून उचलले. त्याच्या भावाला कारमध्ये रक्ताच्या खुणा दिसल्या. त्यानंतर आम्ही पोलीस आणि लष्कराशी संपर्क साधला. आम्ही कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो, असे जावेदचे नातेवाईक आशिक कमद यांनी सांगितले. तसेच जावेदला सुखरूप परत मिळविण्यासाठी राज्यपाल आणि पंतप्रधानांनी लक्ष घालावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी 2017 मध्ये घटना
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांच्या अपहरणाची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकवेळा दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांचे अपहरण केले आहे. मे 2017 मध्येही दहशतवाद्यांनी सुट्टीसाठी घरी आलेल्या औरंगजेब या लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण केले होते. यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. औरंगजेब एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असताना त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. याशिवाय हुतात्मा लेफ्टनंट उमर फयाज आणि हुतात्मा जवान इरफान अहमद दार यांनाही रजेवर घरी जात असताना दहशतवाद्यांनी ठार केले होते.