दिवाडी येथे शिपयार्डमध्ये बांधकाम पूर्णत्वाकडे
प्रतिनिधी/पणजी
राज्यातील पहिली इलेक्ट्रिक तथा सौरऊर्जा फेरीबोट लवकरच कार्यान्वित होणार आहे. याच दरम्यान पणजीत मांडवी नदीत बांधण्यात आलेल्या दुसऱया तरंगत्या जेटीचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. चोडण-रायबंदर मार्गावर या फेरीबोटीचा वापर होण्याची शक्यता आहे.
नदी परिवहन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातच बांधण्यात आलेल्या या इलेक्ट्रिक तथा सौरऊर्जेवर चालणाऱया फेरीबोटीसाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दिवाडी येथील एक्वारियस फायबरग्लास या कंपनीने या फेरीबोटीचे बांधकाम केले आहे. बहुतेक पुढील महिन्यात ती प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू होऊ शकते. सध्या एकच फेरीबोट बांधण्यात आली असून भविष्यात ती संख्या वाढण्याची शक्यता आहे.
डिझेल जनरेटरचीही असेल सुविधा
या इको फ्रेंडली बोटीचा वेग 60 नॉट्स असेल आणि एकावेळी ती 60 प्रवाशांची वाहतूक करू शकेल. या फेरीबोटीसाठी धक्यावर चार्जिंगचीही व्यवस्था करण्यात येईल. एका चार्जमध्ये तीन तासांचा प्रवास करण्याची तिची क्षमता असेल. त्याशिवाय आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी म्हणून डिझेल जनरेटरचीही (बॅकअप) सुविधा असेल असे सदर अधिकाऱयाने सांगितले.
नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे चालणारी ही फेरीबोट प्रथम एका वर्षासाठी बांधकाम करणाऱया कंपनीच्याच तज्ञ चालकांकडून चालविण्यात येणार आहे. त्यादरम्यान नदी परिवहनच्या चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या ही फेरीबोट रायबंदर-चोडण मार्गावर चालविली जाऊ शकते. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्या अधिकाऱयाने सांगितले.
प्राप्त माहितीनुसार हीच फेरीबोट मांडवी आणि झुआरी नद्यांच्या बाजूने पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांच्या दर्शनासाठीही वापरण्यात येऊ शकते. त्याशिवाय संध्याकाळी मांडवीतील समुद्रपर्यटनासाठीही तिचा वापर करण्याच्या दृष्टीने सरकारचा विचार चालला आहे.
नोव्हेंबर 2017 मध्ये तत्कालीन नदी परिवहनमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सौरऊर्जेवर चालणाऱया फेरीबोटीची संकल्पना मांडली होती. तसेच 2018 पर्यंत अशा नवीन फेरीबोटींचा प्रस्ताव तयार होईल, असेही सांगितले होते. त्यानुसार 2017 मध्येच नदी परिवहन खात्यातील अधिकाऱयांनी केरळमधील कोची येथे भेट देऊन तेथे वापरात येणाऱया सौरऊर्जेवर चालणाऱया फेरीबोटींची पाहणी केली होती. विद्यमान सरकारात श्री. ढवळीकर यांच्याकडे वीजमंत्रीपद आले आहे., आणि सौरऊर्जेवरील फेरीबोटीची त्यांची संकल्पना आता प्रत्यक्षात येणार असल्याचे दिसून येत आहे.
तिकीट की मोफत? अद्याप निर्णय नाही
दरम्यान, केरळमध्ये सौर फेरीबोटीसाठी तिकीट आकारण्यात येते. गोव्यात फेरीप्रवास मोफत आहे. केवळ चारचाकी वाहनांकडून तिकीट आकारणी करण्यात येते. त्याच व्यवस्थेनुसार नवी सौर फेरीबोट मोफत असावी की तिकीट आकारण्यात यावे यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती सदर अधिकाऱयाने दिली.









