बेटणे गावातील सौर दिव्यांचे किरण ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन
वार्ताहर/कणकुंबी
जपानमध्ये एक एकर शेत जमिनीमधून कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात आणि आपल्या कणकुंबी भागातील शेतकरी जमिनी विकत आहेत. आपल्या जमिनी सुद्धा कोट्यावधी रुपयांच्या किमतीच्या आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच बागायत पिके घेऊन आपले उत्पन्न वाढविले पाहिजे. आपल्याला सहकार्य करण्यासाठी लोकमान्य सोसायटी आणि लोककल्प फाऊंडेशनतर्फे कणकुंबी भागातील 32 गावे दत्तक घेतलेली आहेत. या भागातील प्रत्येक कुटुंबाचे किमान चाळीस ते पन्नास हजार रुपये आर्थिक उत्पन्न झाले पाहिजेत. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणून लोककल्प फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याला तुमची साथ पाहिजेत. त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. प्रत्येक गावागावात लघुउद्योग सुरू झाले पाहिजेत. आपण उत्पादन केलेल्या मालाच्या विक्र लोककल्पच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे सहकार्य केले जाईल.
त्याचाच एक भाग म्हणून या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. गरीब व गरजू लोकांना बेडशीट, चादर, स्वेटर देण्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यातून किमान दोन गावांमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे. तसेच एक वेगळा उपक्रम व्हावा म्हणून कणकुंबी भागातील बेटणे गावाबरोबरच पारवाड, चोर्ला आणि हंदीकोप्पवाडा गावात सौर दिवे बसविले आहेत. अशी माहिती तरुण भारत वृत्तपत्र समुहाचे प्रमुख व लोकमान्य सोसायटीचे संस्थापक, लोककल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी दिली. लोककल्प फाऊंडेशनतर्फे वरील प्रत्येक गावात पाच सौर ऊर्जेवरील दिवे बसविले आहेत. बेटणेतील सौर ऊर्जेवरील दिव्यांचे उद्घाटन करताना किरण ठाकुर यांनी ही माहिती दिली.
सहकार्य करण्याचे आवाहन
किरण ठाकुर पुढे म्हणाले, आम्ही लोककल्प फाऊंडेशनतर्फे या भागातील प्रत्येक कुटुंबाची आर्थिक माहिती जमा करत आहोत. त्यासाठी आपण सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. प्रारंभी किरण ठाकुर यांच्या हस्ते फीत कापून सौर दिव्यांचे उद्घाटन केले. यावेळी लोककल्प फाऊंडेशनचे संचालक किरण गावडे यांनी प्रास्ताविकात लोकमान्य सोसायटी व लोककल्प फाऊंडेशनच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी लोककल्प फाऊंडेशनच्या सीआरएस मॅनेजर मालीनी बाली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद आसूकर, अनिकेत पाटील, संदीप पाटील, संतोष कदम, अनंत गावडे, विठ्ठल कुन्नुरे, सुहासिनी पेडणेकर, सुहास पेडणेकर, मोतीराम गावडे, बाळाराम गावडे, दत्ताराम गावडे, दत्तात्रय गावडे, गणेश गावडे, महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.









