गोडोली :
ग्रामपंचायतीच्या परस्पर वडूथ हद्दीतील गायरान क्षेत्रात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. याबद्दल गावकऱ्यांना काहीच माहिती न देता शासकीय यंत्रणेने तब्बल 24 एकरात महसूल विभाग आणि महावितरणने या प्रकल्पाचा घाट घातला आहे. गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन करत डोंगरावरून येणारे नैसर्गिक प्रवाह बुजवून ठेकेदाराने काही रस्ते केले असताना महसूल विभागाचे कर्मचारी उत्खनन नसल्याचे सांगतात. संबंधित परप्रांतीय ठेकेदाराला कामाचा आदेश आणि परवानग्या घेतल्या का या बाबतीत विचारणा केली असता थातूरमातूर उत्तरे दिली. ठेकेदाराला आधी कामाचा आदेश, योग्य परवानग्या ग्रामपंचायतीला सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी सादर करा, अन्यथा काम बंद पाडणार, असा इशारा भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे दिला आहे.
सातारा तालुक्यात वडूथ गावाच्या हद्दीतील गायरान क्षेत्रात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नुकतेच काम सुरू झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यभरात असे प्रकल्प उभारले जात आहेत. प्रकल्प परिसरातील लोडशेडींग बंद होऊन शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा होणार आहे. वडूथ हद्दीत हा प्रकल्प महावितरणचा आहे. यासाठी आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सातारच्या महावितरणचे कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन करून या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून वडूथ गावात तर्कवितर्कांना उधाण आले. या कामाच्या ठिकाणी वडूथच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन मुळचा हैद्राबाद येथील असणाऱ्या ठेकेदाराच्या प्रतिनिधीशी चर्चा केली असता त्याने प्रकल्पाची नेमकी माहिती देण्याची टाळाटाळ करत असंबंध उत्तर दिली.
गावाच्या हद्दीतील शासकीय जमीन हस्तांतरित करताना ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना या कामाची कल्पनाही दिलेली नाही. तर महसूल विभागाच्या परस्पर गौण खनिज उत्खनन करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूने डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवून अनाधिकृतपणे रस्ते तयार केले आहेत. याबाबत महसूल कर्मचारी वाच्यता करत नाहीत. उलट उत्खनन झाले नसल्याचा निर्वाळा देत ठेकेदाराची पाठराखण करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साबळे यांनी केला आहे.
याबाबत माहिती विचारली असता संबंधित ठेकेदाराचा इनामदार हे प्रतिनिधींनी असंबंध उत्तरे दिल्याने या कामामागील गौडबंगाल असल्याचा संशय बळावला आहे. उपस्थित गावातील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी सदरच्या कामाबाबत आदेश, परवानग्या घेऊन ग्रामपंचायतीला सादर करा. तोपर्यंत काम बंद ठेवा, असे सांगितले.
गायरानाची अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लावली वाट
वडूथ गावाच्या हद्दीत तब्बल 67.20 हेक्टर गायरान क्षेत्र होते. यापुर्वी धोम धरणातून विस्थापित झालेल्या आसगावचे पुनर्वसन याच ठिकाणी 22.55 हेक्टर क्षेत्रात झाले आहे. कल्याणी स्टील या खाजगी कंपनीला 29.14 हेक्टर क्षेत्र दिले. त्यावेळीही गावकऱ्यांना विश्वासात न घेता गावातील तरुणांना नोकऱ्यांची आमिषाने ही जागा बळकावली. परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासह कर्मचारी निवास व्यवस्था करण्यासाठी 0.80 हेक्टर क्षेत्र घेतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी चर्चा न करताच हस्तांतरित केली आहे.
आता शिल्लक असलेल्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या परस्पर उभारला जात असल्याने वडूथकर संतापले आहेत. त्यात ग्रामपंचायतीला थांगपत्ता न लागू देता या प्रकल्पाचा घाट घातल्याने युवावर्गात संताप व्यक्त केला आहे. गावाच्या परस्पर यापूर्वी गायरान क्षेत्राची अधिकाऱ्यांनी वेळोवेळी वाट लावल्याचा आरोप अजित साबळे, प्रशांत साबळे, आकाश साबळे, अनिकेत साबळे, सूरज निकम, महेश साबळे, सुनील साबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.








