सोलापूर : प्रतिनिधी
धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार शुक्रवारी सोलापुरात घडला. येथील शासकिय विश्रामगृहात धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते शेखर बंगाळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकताच भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व सुरक्षा रक्षकाने कार्यकर्त्याला मारहाण केली.
कार्यकर्त्याला मारहाण झाल्याने काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी निषेध केला आहे. तसेच यापुढे भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील नरोटे यांनी दिला आहे.
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण अद्याप त्यावर मार्ग निघालेला नाही. आता पालकमंत्री विखे पाटील सोलापूर दौर्यावर आहेत. आज शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी निवेदन वाचत असताना खिशातील भंडारा काढून बंगाळे यांनी पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळत आरक्षण देण्याची घोषणा दिल्या. भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह सुरक्षारक्षक यांनी बंगाळे यांना मारहाण केली. नंतर पोलिसांनी बंगाळे यांना ताब्यात घेतले.








