स्फोट इतका जबरदस्त होता की त्यामुळे भीषण आग लागली
सोलापूर : अचानक गॅसचा स्फोट झाल्याने विंचूर येथील चार कुटुंब उध्वस्त झाली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचुर येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अशी माहिती की, विंचूर येथील शिवप्पा लगमण्णा फुलारी, औदूसिद्ध शिवाप्पा फुलारी, बिळेणसिद्ध शिवाप्पा फुलारी, मळसिद्ध शिवप्पा फुलारी यांच्या शेतातील राहत्या घरात गॅसचा स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की त्यामुळे भीषण आग लागली. त्या आगीत संपूर्ण चार कुटुंब उघड्यावर आली. सुदैवाने यात कोणताही दगाफटका झालेला नाही. केवळ एका पाळीव प्राण्याला जीव गमवावा लागला आहे.
या भीषण आगीत एक खिलार खोंड जागेवर जळून खाक झाले आहे. तसेच चारही कुटुंबाच्या घरातील तिजोरी कपाटात असलेले रोख रक्कम 5 लाख 30 हजार रुपये, 13 तोळे सोने, 30 पोती धान्य, एक मोटार सायकल व तसेच घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत सुमारे 35 लाखाचे नुकसान झाले आहे. या भीषण घटनेमुळे चारही कुटुंबप्रमुख व त्यांचे संपूर्ण परिवार असे एकूण 15 सदस्यांवर आज उघड्यावर आले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संपूर्ण गावातून या घटनेची हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची पोलीस व प्रशासनकडून माहिती घेण्यात येत आहे.








