सांगोला प्रतिनिधी
सेंट्रिंग कामगार संतोष जगन्नाथ साळुंखे, वय ४५ वर्षे, रा. सांगोला यांच्या खून प्रकरणी सांगोला पोलिसांनी अवघ्या १५ तासात छडा लावला असून याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे पोलिसांनी तांत्रीक व गोपनीय दृष्ट्या तपास करून आरोपींनी किरकोळ कारणावरून कामगाराचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे पो. नि.अनंत कुलकर्णी व तपास अधिकारी हेमंत काटकर यांनी सांगितले.
या बाबत मिळालेली माहीती अशी कि, सोमवार दि.१९ रोजी संतोष साळुंखे याचा सांगोला शहरातील बायपास रोडवर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून डोक्यात दगड घालून खून केला असल्याबाबत मयताची मुलगी अश्विनी निकम हीने सांगोला पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल केला होता. खून झालेल्या घटनास्थळी आरोपींनी कोणताही पुरावा ठेवला नसताना या कुणाचा शोध लावणे व आरोपींना पकडणे पोलिसांसमोर एक आव्हान होते. पो नि अनंत कुलकर्णी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकामी ४ टीम तयार केल्या होत्या. तांत्रीक व गोपनिय माहिती काढुन विश्लेषण करून या खुनाचा तपास अवघ्या १५ तासात करून सुनिल समाधान म्हस्के वय १९ , अजय शिवाजी राउत वय १८ दोघे रा. संजयनगर झोपडपटटी सांगोला यांना तर एक अल्पवयीन आरोपी अशा तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तीन आरोपींनी किरकोळ कारणावरून संतोष साळुंखे याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे यातील एक आरोपीत हा विधी संघर्ष बालक असुन त्यास सोलापूर येथे बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पो नि अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.
पोलिसांना या खुनाचा तपास करताना मयत संतोष साळुंखे याचे कोणासोबत ही वैर नसल्याचे आढळून आले. घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा पुरावा आरोपी यांनी ठेवलेला नव्हता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांना कठीण झाले होते. या तपास कामी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चार टिम बनवुन तपास सुरू केला आहे व तपासाचे विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करुन सर्व आरोपींना १५ तासात अटक केली.









