सांगोला : प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील वासोद गावात एका पोलीस उपनिरीक्षकाचा धारदार हत्याराने डोक्यात आणि पाठीच्या मागील बाजुस वार करुन खुन केल्याची घटना आज सकाळी पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. सुरज विष्णु चंदनशिवे वय 43 वर्षे, रा. वासुद ता. सांगोला असे खून झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून सांगोला तालुक्यात सलग दोन दिवसात दोन खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुरज चंदनशिवे हे ते सांगली जिल्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक या पदावर नेमणुकीस होते. सध्या काही कारणास्तव ते निलंबित असल्याने त्यांचे मुळ गावी वासुद ता. सांगोला येथे राहत होते. सुरज चंदनशिवे हे बुधवार दि.२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वानऊ वा.च्या सुमारास त्यांच्या घरामधुन जेवण करुन फिरण्यासाठी गेले होते. रात्री उशीरापर्यंत घरी परत न आल्याने चंदनशिवे कुटुंबीयांनी सुरज यांचा शोध घेतला असता वासुद गावच्या शिवारात त्यांचा मृतदेह आढळला. सुरज चंदनशिवे यांत्यावर धारदार हत्याराने डोक्यात व पाठीत मागील बाजुस वार केल्याचेही दिसून आले. त्यांचा मृतदेह आप्पासो रामचंद्र केदार यांच्या शेतात टाकून दिला होता.
खूनाची बातमी समजतात पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. सोलापूरचे ॲडिशनल एस. पी. हिम्मतराव जाधव, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी भेट देऊन तपासणी कामी पुढील आदेश दिले आहेत. याबाबत सौरभ भारत चंदनशिवे याने तक्रार नोंदवली आहे.









