महापुरुषांच्या अवमान प्रकरणी आंबेडकरी संघटना व सर्वपक्षीयांनी काढला मोर्चा; बंदला व्यापाऱयांचाही पाठिंबा; एकादशीसाठी पंढरीत आलेल्या भाविकांना बंदचा फटका
पंढरपूर प्रतिनिधी
थोर महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या पंढरपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून दुकाने, आस्थापना बंद ठेवून व्यापारी व नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आहे. दरम्यान, आंबेडकरी संघटना व सर्वपक्षीयांनी शहरातून मोर्चा काढत बंद यशस्वी केल्याचे चित्र दिसून येत होते.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील व भाजप नेते सातत्याने अवमानकारक भाष्य करत आहेत. महापुरुषांच्या अवमानप्रकरणी आंबेडकरी संघटना व सर्वपक्षांनी सोमवार, 19 रोजी सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत पंढरपूर बंदची हाक दिली होती. या बंदला व्यापारी व दुकानदारांनी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सोमवारी सकाळपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्याची दुकाने उघडण्यात आलेली होती. मात्र, पंढरपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे, हे समजताच पटापट दुकाने बंद करण्यात आली. स्वयंस्फूर्तीने व्यापारी व नागरिकांनी बंदला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील सफला एकादशी असून देखील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी, दुकानदारांनी घेतला. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बंदचा फटका बसला आहे.
सकाळी दहा वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दाखल झाला. येथे जोरदार घोषणाबाजी करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली.
सोमवारी दिवसभर पंढरपूर शहरातील वर्दळीची ठिकाणी असलेल्या स्टेशन रोड, महाद्वार चौक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग, भोसले चौक, नाथ चौक, संत पेठ, बसस्थानक, नगरपालिका परिसर, सावरकर चौक, चप्पल लाईन परिसरातील दुकाने, आस्थापना दिवसभर बंद होत्या. त्यामुळे पंढरपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत होते.
या बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नागेश फाटे, किरणराज घाडगे, सुधीर भोसले, उमेश सासवडकर, संदीप मांडवे, काँग्रेसचे अमरजित पाटील, समीर कोळी, राजेश भादुले, वंचित बहुजन आघाडीचे सुनील वाघमारे, सागर गायकवाड, रिपाइंचे Deॅ[. किर्तीपाल सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, अमित कसबे, विशाल मांदळे, आम आदमी पार्टीचे महादेव पाटील, दिलीप देवकुळे, तसेच कृष्णा वाघमारे, संतोष सर्वगोड, अखिलेश वेळापूर, अमर शेवडे, महेंद्र जाधव, अंबादास वायदंडे आदींसह विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या बंदमध्ये सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे व मंडल अधिकारी शिवशरण यांना देण्यात आले.
मंदिर परिसरातील दुकानेही बंद
पंढरपूर बंदची हाक देण्यात आल्याने सोमवारी मार्गशीर्ष महिन्यातील सफला एकादशी असून देखील मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्याची व इतरही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या बंदला व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. यामुळे एकादशीला आलेल्या भाविकांना बंदचा फटका सहन करावा लागला.









