आषाढीचा सोहळा आटोपून वारकरी घरी परतू लागले; ठिकठिकाणी चक्का जाम; आषाढीनंतर पावसाला सुरुवात
सोलापूर प्रतिनिधी
आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा झाला. या सोहळ्यानंतर लाखो भाविकांनी रविवारी मध्यरात्रीपासून पंढरीचा निरोप घेण्यास सुरुवात केली. यामध्ये सोमवारी दुपारपर्यंत सुमारे नऊ ते 10 लाख भाविकांनी पंढरीचा निरोप घेतल्याचे चित्र आहे. सध्या केवळ परंपरागत पौर्णिमेपर्यंत वास्तव्यास असणारेच भाविक पंढरीत आहेत. रविवारी दिवसभर पावसाने उसंत दिल्याने भाविकांना नगरप्रदक्षिणा करता आली. सोमवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने सर्वत्र चिखल साचलेला दिसत आहे.
अधिक वाचा- सांगलीत अतिवृष्टी कायम;अलमट्टीचा विसर्ग पाऊण लाखांवर
एकादशीचा उपवास झाल्यानंतर द्वादशीचे गोडाचे जेवण वारकरी भक्तांनी घेतले. यानंतर सोमवारी अगदी पहाटेपासूनच पंढरीचा निरोप घेण्यासाठी भाविकांची ओढ होती. त्यामुळेच एसटी स्टँड तसेच रेल्वे स्टेशनवर देखील मोठय़ा प्रमाणावर भाविकांची दाटी दिसून आली. विशेष म्हणजे आषाढीसाठी रेल्वे विभागाकडून विशेष रेल्वे गाडय़ांची सोय करण्यात आली होती. अमरावती, खामगाव, औरंगाबाद, जालना, लातूर, कुर्डुवाडी, नागपूर, भुसावळ, मिरज याठिकाणी जाण्यासाठी पंढरपूर रेल्वे स्थानकातून जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे.
तसेच एसटी महामंडळाकडूनसुद्धा चार बसस्थानकांमधून महाराष्ट्रात विविध गावी जाणाऱया व्यक्तींसाठी चांगल्या प्रकारची सोय करण्यात आली होती. परंतु पावसाच्या व्यत्ययाने तीन रस्ता येथील भीमा बसस्थानकात पाणी साचल्याने भाविकांची गैरसोय झाली. तसेच या मार्गावर रस्त्याच्या कडेलाच वाहनांची पार्किंग, एसटी बसस्थानकातून निघताना खोळंबलेली वाहतूक यामुळे भाविकांना याचा मनस्ताप झाला. चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक, शासकीय आयटीआय कॉलेज येथून भाविक आपापल्या घरी परतू लागले आहेत. एसटी महामंडळाच्या बरोबरीनेच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक येथील देखील बस मोठय़ा संख्येने पंढरीच्या वारीसाठी सोडण्यात आल्या होत्या.
वाहतूक कोंडीमुळे भाविकांना त्रास
एसटी बरोबरच खासगी टॅव्हल्स, गाडय़ांमधून सुद्धा भाविक पंढरपुरातून भाविक बाहेर पडू लागले आहेत. मुंबई, कोकण, विदर्भ आदी परिसरातील ट्रव्हल्सची संख्या लक्षणीय असलेली दिसून आली. त्याचबरोबरीने दिंडय़ांचे ट्रकदेखील मोठय़ा संख्येने पंढरीतून सकाळी परतत होते. त्यामुळे पंढरपूर-कुर्डुवाडी रोड, पंढरपूर-मोहोळ रोड, 65 एकर परिसर, तीन रस्ता ते बायपास पंढरपूर या मार्गावर पूर्णपणे चक्काजाम झाले होते. चक्काजाममध्ये रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांचे सुद्धा हाल झाले.









