करमाळा/प्रतिनिधी
तालुक्यातील साडे येथील सिद्धेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात पार पडला. आठ दिवस चाललेल्या या भक्तिमय सोहळ्यात साडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ भक्तिसागरात न्हावून निघाले. साडे व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
मागील कोरोनाच्या संकटामुळे ग्रामस्थांना सप्ताहाचे आयोजन साध्या पद्धतीने करावे लागले होते. परंतु या वर्षी कोरोनाचे संकट नसल्यामुळे समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी व तरुण मंडळीनी सप्ताहाचे आयोजन चांगल्या पद्धतीने करायचे ठरवले होते. या गावात २५० वर्षापासून श्रावण महिन्यात श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात हरिनाम सप्ताहाची परंपरा असल्याचे सांगण्यात येते. त्या अनुषंगाने साङे गावचे सुपुत्र ह. भ. प. संजयानंद झानपुरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर तरूण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात दररोज सकाळी काकडा भजन, सायंकाळी ह.भ.प.संजयानंद झानपुरे महाराज यांचे हरिपाठ, प्रवचन व कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तालुकावासियांनाही निमंत्रित करण्यात आले होते. ह.भ.प.संजयानंद झानपुरे महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
भगवंताचे नामस्मरण करणे ही भक्ताची ताकत असून देवाचे स्मरण नामस्मरण करत रहा, आपले ज्या गोष्टीपासुन नुकसान होणार आहे, अशा गोष्टींपासुन सावध रहा. ह.भ.प.संजयानंद झानपुरे महाराज, साडे ता.करमाळा