करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या एका बाजूला उजनी धरण व दुसऱ्या बाजूला कोळगाव धरण, असा समृद्ध तालुका म्हणून त्याची ओळख, पण मेडिकल सेवेसाठी मात्र कायम मागास असणारा तालुका!! साधी रक्ताची पिशवी पाहिजे असेल तर, बार्शी व कुर्डूवाडी या शहरावरती अवलंबून राहावे लागत होते. बऱ्याच वेळेस रक्ताच्या पिशवीच्या खर्चापेक्षा जास्त खर्च प्रवासाचा होत होता. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत होते. अशा परिस्थितीत नागरिकांची व गोरगरीब रुग्णांची गरज ओळखून समाजसेवेचा वसा घेऊन करमाळा शहरात, श्री कमलाभवानी ब्लड बँकेची सुरुवात झालेली आहे. डायलिसिस सारखे पेशंट तसेच इतर सर्व पेशंटला लागणारी रक्ताची गरज या ब्लड बँकेमुळे भागणार आहे.
करमाळा शहर व परिसरातील लोकांमध्ये याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. श्री कमलाभवानी ब्लड बँकेचे संचालक निलेश पाटील यांनी या ब्लड बँकेमार्फत आम्ही रुग्णांना 24 तास सेवा देऊ, तसेच भविष्यात या बँकेमार्फत विविध प्रकारच्या रुग्णांसाठी, समाज उपयोगी असे उपक्रम आम्ही करमाळा शहर व तालुक्यात राबवून, सुसज्ज अशी मेडिकल सेवा ग्रामीण भागातील रुग्णांना देऊ. याशिवाय थॅलेसमिया असणाऱ्या रूग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जाईल असे हि त्यांनी यावेळी सांगितले आहे. आता गणेशोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्ताने तालुक्यातील अनेक गणेश मंडळे रक्तदान शिबीर, किंवा इतर समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. अशा मंडळांना आता तालुक्यातच हक्काची कमलाई ब्लड बँक सुरु झालेली आहे. त्यामुळे समाज उपयोगी उपक्रम राबविणाऱ्या मंडळांनी रक्तदान शिबीरांसाठी व रक्ताची गरज भासल्यास कमलाई ब्लड बँकेस अवश्य संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.









