डिजिटल अटक धमकीने सोलापूर व्यापाऱ्याची फसवणूक
सोलापूर : सीबीआय इंडिया येथे गुन्हा दाखल असून तुम्हाला डिजिटल अटक केल्याचे सांगून सोलापुरातील व्यापाऱ्याची ४१ लाखांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी चार ते ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.२७ वाजण्याच्या दरम्यान सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी नारायणदास किसनदास भुतडा (वय ६९, रा. जैन मंदिर जबळ, जोडभावी पेठ, सोलापूर) यांनी आरोपी राजेश शर्मा, संदीप राव तसेच सर्व बँक खातेधारक व इतर साथीदार यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ३ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरच्या दरम्यान यातील फिर्यादी नारायणदास भुतडा व त्यांची पत्नी हे घरी तसेच दुकानात असताना ही घटना घडली.
भुतडा व त्यांची पत्नी यांच्या मोबाईलवर यातीलआरोपी राजेश शर्मा याने मी न्यू दिल्ली येथील दूरसंचार विभागातून सीनियर अॅडव्हायझर बोलत असल्याचे सांगितले.तर दुसरा आरोपी संदीप राव यांनीही भुतडा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून दिल्ली येथून सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगितले.
या दोघांनीसंगनमत करून भुतडा यांचा मोबाईल क्रमांक सांगून तो तुमच्या नावावर आहे. त्याच्या आधार कार्डद्वारे फिर्यादी यांच्या नावाने कॅनरा बँकेत खाते काढून ते नरेश्वरी यांना पाच लाख रुपयांमध्ये विकले आहे, असे सांगितले. तसेच दोन कोटी रुपये रक्कम जमा झाली असून त्यापोटी तुम्हाला यांना २० लाख रुपये कमिशन मिळाल्याचे सांगितले. तुमच्या विरोधात सीबीआय इंडिया येथे गुन्हा दाखल असून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आली असल्याचे सांगितले.
तसेच याबाबत कोणाशी चर्चा करायची नाही, अशी भीती घातली. त्यानंतर भुतडा यांच्या व्हॉट्सअॅप बर वेगवेगळ्या विभागाचे खोटे इंग्रजी भाषेत लिहिलेली बनावट कागदपत्रे तसेच सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असलेली कागदपत्रे व बँक खात्याची कागदपत्रे पाठवली. त्यानंतर भुतडा यांना आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.
त्यानुसार फिर्यादी भुतडा यांनी त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर ४१ लाख रुपये पाठवले. त्यानंतर आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे भुतडा यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.








