नंदकुमार साळुंखे /नातेपुते
सोलापूर : आषाढी एकादिशी म्हटलं की देशभरातून वारकरी विठूरायाच्या भेटीला पंढरपूरला जात असतात. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली’ नामाचा गजर करत पालखी पंढरीच्या दिशेने जाते. या पालखी सोहळ्यात भक्तजण कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन सेवा बजावत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या मार्गावर अशीच सेवा बजावणारी माऊली सध्या चर्चेत आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते या गावातील विठ्ठल भक्त राजश्री जुन्नरकर हिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. राजश्रीचे बाळ ५ महिन्यांचे आहे तरी देखील ती पालखी समोर धावत जाऊन रांगोळीच्या पायघड्या घालत असल्याचे दिसते. केवळ परिसरातच नाही तर महाराष्ट्रात तिच्या या व्हिडिओची चर्चा सुरु आहे.कोण आहे ही नातेपुतेची माऊली जाणून घेऊया.

राजश्री भागवत जुन्नरकर हि नातेपुते गावात राहते. दरवर्षी ती आळंदी ते पंढरपुर २५० किलोमीटरच्या अंतरावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या मार्गावर पालखी समोर रांगोळीच्या पायघड्या धावत जावुन घालत असते. गेली ११ वर्षे ती सेवा देत आहेत. रांगोळीच्या माध्यमातुन लेक वाचवा, महिला सुरक्षा, पाणी वाचवा, स्वच्छ वारी निर्मल वारी,प्लॅस्टीक मुक्त वारी असे समाजप्रबोधनाचे प्रभावी संदेश ती या वारीतून देत आहे.

वारकर्यांची पावले जशी पंढरीच्या दिशेने वेगाने चालतात तशीच राजश्री ही धावत रांगोळी काढते. रांगोळीत जे शब्द लिहायचे असतात ते शब्द उलटया दशेने लिहते.तरीही ती अक्षरे रेखीव व सुबक असतात. १ किलोमीटर रांगोळी काढण्यासाठी तिला १५ मिनिटांचा वेळ लागतो. तर एका अश्व रिंगणाला पूर्ण गोलाकार रांगोळी काढण्यासाठी तिला ११ मिनिटे लागतात. जिथे जिथे पालखी विसावेल तेथे तेथे रांगोळीच्या पायघड्या ती घालते.

आळंदी ते पंढरपुर रांगोळ्याची पायघडी घालण्यासाठी तब्बल ८५ पोती पांढरी रांगोळी, ४०० किलो कलर रांगोळी लागत असल्याचे राजश्री भागवत यांनी सांगितले.रांगोळीच्या सेवेबद्दल सेवाभावी संस्थांकडून मदत ही केली जाते.

कोरोना नंतर दोन वर्षांनी वारी सोहळा असल्याने राजश्री भागवत हीने आपल्या पाच महिन्यांच्या तान्हुल्यासह वारीत रांगोळ्यांची पायघडी घातली. विराज तान्हुलाला ही वारीचा लळा लागलेला आहे. राजश्री भागवत म्हणतात पती नितिन भागवत,आई ,वडील,सासुबाई यां खंबीरपणे पाठीशी असुन प्रोत्साहन
लाभत असल्याचे सांगितले.









