महिलेला मरेपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्याची; जलदगतीने निकाल लागण्याची आणि फाशीची शिक्षा लागण्याची जिल्हा न्यायालयातील पहिलीच घटना
प्रतिनिधी / सोलापूर
16 महिन्यांच्या मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी पती-पत्नीला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशीं यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
धोलाराम अर्जुनराम बिष्णोई (वय 26) व पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (वय 20) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. जानेवारी 2022 मध्ये आरोपी धोलारामने 16 महिन्यांच्या मुलीला दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. यामुळे विव्हळणाऱ्या मुलीचा आवाज बंद करण्यासाठी गळा दाबून त्याने खून केला. एकूणच समाजाला काळिमा फासणाऱ्या या घटनेत आरोपीच्या पत्नीने आरोपीला मदत केली. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपी आणि त्याची पत्नी हे रेल्वेने प्रवास करीत होते. मुलीची कोणतीच हालचाल दिसत नसल्याने व संशय निर्माण झाल्याने प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन मुलीची उत्तरीय तपासणी केली. यामध्ये अत्याचार करून मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने 31 साक्षीदार तपासण्यात आले. हा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, डीएनए अहवाल, सीए अहवालावर आधारित असल्याने त्याच्याशी निगडित सर्व पुरावे सरकारच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आले. खटल्याची सुनावणी एप्रिल व मे 2022 या काळात झाली. सिकंदराबाद, वाडी, सोलापूर, राजस्थान व नेपाळ या ठिकाणाहून साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे नेपाळ येथील साक्षीदाराची तपासणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. या खटल्यातील 31 साक्षीदारांमध्ये एकवाक्यता दिसून आली. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, आरोपीच्या वतीने ऍड. संदीप शेंडगे, फिरोज शेख यांनी काम पाहिले. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सपोनि अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, पोलीस नाईक देवानंद क्षीरसागर यांनी केला.
दुर्मिळातील दुर्मिळ घटना
16 महिन्यांच्या मुलीचा नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार करून खून करण्यात आला होता. आरोपीविरोधात भक्कम पुरावा सादर करण्यात आला. डीएनए रिपोर्ट, न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात आरोपीने गुन्हा केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अमानवी कृत्य करणाऱयांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरा पर्याय नसून दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला.प्रदीपसिंग राजपूत,
जिल्हा सरकारी वकील, जिल्हा न्यायालय, सोलापूर