१२ तलवारी हस्तगत; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई
अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट शहरात तसेच तालुक्यातील करजगी, जेऊर, पानमंगरूळ येथे धारधार तलवारी विक्री केल्याप्रकरणी बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा रा. काशीराया, जेऊर यास अटक केली. तसेच त्याच्याकडून तलवार खरेदी केल्याप्रकरणी इतर १० जणांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेने गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याकडून १२ तलवारी जप्त केल्या आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा रा. जेऊर ता. अक्कलकोट यांने विक्रीसाठी धारधार तलवारी विक्रीसाठी आणल्यची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडले.
बमलिंग बमगोंडा याच्याकडून तलवारी खरेदी केलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंद झाली आहेत. या आरोपींनी दहशत पसरवण्यासाठी या तलवारी खरेदी केल्याचे गुन्हे शाखेसमोर कबुल केले आहे. या तलवारींची एकूण किंमत 26100/- रूपये असून त्यांना पितळी व स्टीलच्या मुठी आहेत. या घटनेची फिर्याद पो हे कॉ विजयकुमार भरले यांनी दिली तर पुढील तपास सपोनि काकडे हे करीत आहेत.