न्हावेली / वार्ताहर
कोंडुरा ते तळवणे-आरोंदा रस्त्याच्या एका बाजूने पाईपलाईनसाठी केलेली खोदाई वाहनचालकांसाठी धोकादायक बनत आहे. संपूर्ण माती रस्त्यावर येऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभय आणि या दोघांना आमदार दीपक केसरकर यांचे अभय मिळत आहे. येथून धावणाऱ्या गाड्यांचा अपघात होऊन कोणी दगवल्यास ठेकेदार, अधिकारी व स्थानिक आमदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुका माजी संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी दिला आहे.
कोंडुरा-तळवणे-आरोंदा परिसरातील नागरिक व वाहनचालकांनी केलेल्या तक्रारीनुसार रस्त्याची पाहणी केल्यानंतर श्री. परब बोलत होते. पाईपलाईन खोदाईची माती रस्त्यावर येऊन चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता निर्धोक करणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्य होते. परंतु सहा सात महिने उलटूनही याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. मुळात स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचेच अशा बेजबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांना अभय असल्याचा आरोप महेश परब यांनी केला.
स्वतःच्या मतदार संघाकडे दुर्लक्ष करत आमदार दीपक केसरकर नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीच्या पाठीमागे तर कधी मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे धावतात. मतदार संघातील धोकादायक रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांना अपघात होणार याकडे आमदार केसरकर दुर्लक्ष करतात. अशा बेजबाबदार लोकांना आम्ही आमदार म्हणून निवडून देतो आणि हे लोक आपल्याला मरणाच्या दारात सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीमागे धावतात, असा खोचक टोला महेश परब यांनी लगावला. तसेच आठ दिवसांत आरोंदा- कोंडुरा रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अन्यथा अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुका माजी संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी दिला.









