संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : एकीकडे महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि गटारींची सफाई केली जात आहे तर दुसरीकडे नाल्यांमध्ये माती आणि केरकचरा टाकला जात आहे. समर्थनगर येथील नाल्यात बांधकामाचे साहित्य व माती टाकली जात असल्याने स्थानिकांतून त्याला तीव्र विरोध केला जात आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील नाले व गटारींचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी गटारी व नाल्यांची सफाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. उशिरा जागे झालेल्या महापालिकेकडून नाले सफाईचे काम हाती घेतले जात आहे तर दुसरीकडे समर्थनगर येथील नाल्यात घरांच्या बांधकामाचे साहित्य व माती टाकली जात आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर प्लास्टिक व केरकचरा मोठ्या प्रमाणात पडला असून त्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नाल्यात माती टाकणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.









